Fisherman lost at sea for 3 months Survived on rainwater turtles
International Fishermen’s Day : एखाद्या थरारक चित्रपटाला लाजवेल अशी ही कहाणी आहे मॅक्सिमो नापा कॅस्ट्रो यांची. वयाच्या ६१व्या वर्षी त्यांनी अशक्यप्राय संकटांशी सामना करत तब्बल ९५ दिवस समुद्रात भटकत राहून मृत्यूला हरवलं आणि अखेर जिवंत किनाऱ्यावर पोहोचले. समुद्रात हरवलेला हा मच्छीमार तीन महिन्यांनंतर इक्वेडोरच्या जहाजाच्या मदतीने वाचवण्यात आला, आणि सध्या त्यांच्या धैर्याचं कौतुक पेरूभर केलं जात आहे.
कॅस्ट्रो ७ डिसेंबर रोजी पेरूमधील मार्कोना बंदरातून मासेमारीसाठी समुद्रात गेले होते. परंतु, अचानक खराब हवामानामुळे त्यांच्या बोटीचा मार्ग बदलला गेला आणि ते सागराच्या विशालतेत हरवले. ना दिशेचा ठाव, ना किनाऱ्याचा पत्ता… कॅस्ट्रोची बोट दिवसेंदिवस समुद्रात भरकटत राहिली. अखेर ११ मार्च रोजी, उत्तर पेरूच्या किनाऱ्याजवळ एका इक्वेडोरियन मच्छीमार जहाजाने त्यांना पाहिलं आणि वाचवलं. तेव्हा कॅस्ट्रो अत्यंत अशक्त, उपाशी आणि तहानलेले होते. वैद्यकीय तपासणीनंतर त्यांना पैता शहरातील नुएस्ट्रा सेनोरा डी लास मर्सिडेज रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : इराण हट्टाला पेटला! अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही ‘Fordow Nuclear Power Plant’च्या सॅटेलाईट प्रतिमा पाहून इस्रायल अस्वस्थ
कॅस्ट्रो यांनी स्थानिक पत्रकारांशी बोलताना सांगितलं की, “बोटीत साचलेलं पावसाचं पाणी पिऊन तहान भागवत होतो. खाण्यासाठी कीटक, पक्षी आणि एकदा तर कासवही खाल्लं.” शेवटचे १५ दिवस अत्यंत कठीण होते कारण त्या काळात काहीही खाण्यास मिळालं नव्हतं. त्यांनी असेही नमूद केलं की, “हे सर्व सहन करणं सोपं नव्हतं, पण जगायचं ठरवलं होतं.”
कॅस्ट्रोच्या या जगण्यामागे त्यांचं धैर्य आणि कुटुंबावरील प्रेम हे प्रमुख कारण होतं. “माझ्या आईसाठी मी जगलो. तिची काळजी वाटत होती. माझी एक छोटी नात आहे, तिच्यासाठी मी परतायचं ठरवलं. दररोज स्वतःला सांगायचो, की अजूनही घरी जायचं आहे, मी हार मानू शकत नाही.”
कॅस्ट्रोच्या मुलीने इनेस नापा टोरेसने वडिलांसाठी तीन महिन्यांपर्यंत शोध मोहीम राबवली. ३ मार्च रोजी तिने फेसबुकवर एक भावनिक पोस्ट लिहून त्यांच्या शोधासाठी लोकांकडे मदत मागितली होती. “प्रत्येक दिवस आमच्यासाठी अधिक वेदनादायक ठरत आहे. आईसाठी आणि आजीसाठी हा काळ अत्यंत त्रासदायक आहे”, असं तिने लिहिलं होतं.
इक्वेडोरच्या मच्छीमारांनी कॅस्ट्रोला वाचवल्यानंतर, कुटुंबीयांना दिलासा मिळाला. इनेसने फेसबुकवर पुन्हा एकदा पोस्ट लिहीत त्यांचे आभार मानले आणि आपल्या वडिलांची परतफेर ही एक ‘चमत्कारीक भेट’ असल्याचं म्हटलं.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘डेथ टू इजरायल, डेथ टू अमेरिका…’ इस्रायली हल्ल्यात जीव गमावलेल्या लष्करी कमांडर आणि अणुशास्त्रज्ञांना इराणचा अंतिम निरोप
ही कहाणी धैर्य, आशा आणि कुटुंबप्रेमाची प्रेरणादायक कथा आहे. मृत्यूशी थेट झुंज देत कॅस्ट्रो जिवंत परतले आणि त्यांच्या संघर्षाने संपूर्ण जगाला खिळवून ठेवलं आहे. हे प्रकरण केवळ एक बातमी नसून, मानवी इच्छाशक्तीचा विजय आहे.