कथा पहिल्या महिला गुप्तहेराची (फोटो सौजन्य: @ByRakeshSimha X.com)
आज भारत आपला ७९ वा स्वातंत्र्य दिवस साजरा करतोय. यानिमित्ताने देशात अनेक ठिकाणी विविध कार्यक्रम पाहायला मिळतात. तसेच दरवर्षी एक ठरलेलं देशभक्तीवरील गाणं सुद्धा कानावर पडतं. ते गाणं म्हणजे ‘ऐ मेरे वतन के लोगों’. हे गाणं ऐकताच आपल्याला त्या क्रांतिकारी वीरांची आठवण होते ज्यांनी स्वातंत्र्याच्या अग्निकुंडात उडी घेतली. मात्र इतिहासाच्या पानात अनेक अशी नावं आहेत, जी विस्मरणात गेली. त्यातीलच एक नावं म्हणजे Neera Arya.
छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यात गुप्तहेरांना विशेष महत्व होते. अगदी असेच महत्व भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात देखील होते. असे म्हंटले जाते की नीरा आर्या या भारताच्या पहिल्या महिला गुप्तहेर होत्या, ज्या नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेत कार्यरत होत्या.
नीरा आर्या यांचं जन्म ५ मार्च १९०२ रोजी उत्तर प्रदेशातील बागपत येथील खेकरा शहरात झाला. त्यांना लहानपणापासूनच भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घ्यायचा होता. पुढे त्या आझाद हिंद सेनेच्या राणी झाशी रेजिमेंटमध्ये सहभागी झाल्या.
नीरा आर्या नेताजींच्या सैन्यात कार्यरत असताना त्यांचे लग्न ब्रिटिश राजवटीतील सीआयडी इन्स्पेक्टर श्रीकांत जय रंजन दास यांच्याशी झाले. त्यामुळे त्या आझाद हिंद सेनेत अत्यंत सावधपणे काम करत होत्या. मात्र, लवकरच त्यांच्या पतीला त्या नेताजींशी संपर्कात असल्याची माहिती मिळाली.
एका दिवशी नेताजींना भेटण्यासाठी नीरा घरातून निघाल्या तेव्हा त्यांचे पती त्यांचा गुपचूप पाठलाग करत होते. भेटीदरम्यान, श्रीकांत जय रंजन दास अचानक बोस यांच्यावर हल्ला करण्यास पुढे सरसावले. मात्र, नेताजींचे प्राण वाचवण्यासाठी नीरा यांनी स्वतःच्या पतीला ठार केले. यानंतर, ब्रिटिश अधिकाऱ्याची हत्या केल्याच्या आरोपाखाली त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावण्यात आली.
नीरा यांची रवानगी अंदमानमधील सेल्युलर जेल येथे करण्यात आली. तेथील ब्रिटिश अधिकारी त्यांना नेताजींबद्दल रोज विचारत असत. तेव्हा त्या म्हणायच्या, “नेताजी तर प्लेन क्रशमध्ये निधन पावले”. First Lady Spy Of INA: Neera Arya- Espionage and Heroism in the INA या फरहाना ताज लिखित पुस्तकात नीरा आर्य यांची संघर्ष कहाणी सांगण्यात आली आहे.
नेताजी कुठे आहेत? हा प्रश्न त्यांना वारंवार विचारला जात असे. एकदा त्या चिडून म्हणाल्या,” नेताजी माझ्या ह्रदयात आहेत”. हे ऐकताच जेलर म्हणाला,” असे असेल तर मग त्यांना बाहेर काढा”. यानंतर नीरा यांचे कपडे फाडण्यात आले आणि त्याचे स्तन कापण्यात आले.
पुढे देश स्वतंत्र झाल्यानंतर त्यांची तुरुंगातून सुटका झाली. स्वतःच्या उदर्निवाहासाठी त्यांनी फुलं विकण्यास सुरु केलीत. अखेर भारताच्या या रणरागिणीने २६ जुलै १९९८ रोजी हैदराबाद येथे अखेरचा श्वास घेतला. अशा, या भारताच्या पहिल्या महिला गुप्तहेराला नवराष्ट्राचा सलाम. जय हिंद.