Independence Day 2025 One Indian state gained freedom 14 years after 1947 find out which
Independence Day 2025: भारत १५ ऑगस्ट १९४७ रोजी ब्रिटिशांच्या दीर्घ २०० वर्षांच्या राजवटीतून मुक्त झाला. या दिवशी देशभर जल्लोष झाला, तिरंगे फडकले आणि नव्या भारताचा पहाटेचा सूर्य उगवला. मात्र, स्वतंत्र भारताच्या नकाशावर एक कोपरा असा होता, जिथे अजूनही परकीयांचा झेंडा फडकत होता. हे होते गोवा, दमण आणि दीव जे भारत स्वतंत्र झाल्यानंतरही पोर्तुगीजांच्या ताब्यात होते. या स्वातंत्र्यासाठी गोव्यातील जनतेला आणि भारताला तब्बल १४ वर्षे प्रतीक्षा करावी लागली.
गोव्याचा इतिहास १५१० साली बदलला, जेव्हा पोर्तुगीजांनी हा सुंदर किनारपट्टीचा प्रदेश जिंकून घेतला. पुढील जवळपास ४५० वर्षे त्यांनी गोवा, दमण आणि दीववर राज्य केले. १९४७ मध्ये भारत स्वतंत्र झाला तेव्हा दिल्लीमध्ये तिरंगा फडकत होता, पण गोव्यात मात्र पोर्तुगीज ध्वजच फडकत होता. भारत सरकारने गोवा भारतात विलीन करण्याची मागणी केली, मात्र त्या वेळीचे पोर्तुगीज हुकूमशहा अँटोनियो सालाझार यांनी ती मागणी धुडकावून लावली.
१९४७ ते १९६१ या काळात गोव्यात स्वातंत्र्याच्या चळवळी उसळल्या. हजारो स्वातंत्र्यसैनिकांनी पोर्तुगीज सत्तेविरोधात आवाज उठवला, मोर्चे काढले, तुरुंगवास भोगला. भारत सरकारने शांततेत तोडगा काढण्याचे प्रयत्न केले, पण पोर्तुगीज हट्टावर ठाम राहिले. अखेर १४ वर्षांच्या संघर्षानंतर निर्णायक पाऊल उचलण्यात आले.
हे देखील वाचा : US-Pakistan चे वाढले प्रेम; मात्र असीम मुनीरच्या धमकीनंतरही अमेरिकेने का पाळले आहे मौन? भारताची सावध भूमिका
१८ डिसेंबर १९६१ रोजी भारतीय लष्कर, नौदल आणि हवाईदलाने संयुक्त लष्करी कारवाई सुरू केली, ज्याला ‘ऑपरेशन विजय’ असे नाव देण्यात आले. अवघ्या ३६ तासांत पोर्तुगीज सैन्याचा पराभव झाला. १९ डिसेंबर १९६१ रोजी पोर्तुगीज गव्हर्नर जनरल मॅन्युएल अँटोनियो वासालो ई सिल्वा यांनी आत्मसमर्पण केले. अशा प्रकारे १४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर गोवा अखेर भारताच्या कुशीत आला.
आजही १९ डिसेंबर रोजी गोव्यात गोवा मुक्ती दिन मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. हा दिवस भारतीय सैन्याच्या शौर्याचा आणि गोव्यातील जनतेच्या त्यागाचा प्रतीक आहे. गोव्याच्या स्वातंत्र्यामुळे भारताची अखंडता आणि सार्वभौमत्व अधिक मजबूत झाले.
स्वातंत्र्यदिन हा केवळ भूतकाळातील विजयाचा दिवस नाही, तर आपल्या एकतेचा, राष्ट्रीय अभिमानाचा आणि कर्तव्यभावनेचा दिवस आहे. १५ ऑगस्टला लाल किल्ल्यावर पंतप्रधान तिरंगा फडकवतात आणि राष्ट्राला संबोधित करतात. देशभर शाळा, महाविद्यालये, सरकारी कार्यालयांत देशभक्तीपर गाणी, सांस्कृतिक कार्यक्रम, परेड आयोजित केल्या जातात.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Karachi Aerial Firing : पाकिस्तानमध्ये हा कसला स्वातंत्र्यदिन साजरा? हवाई गोळीबारात कहर, 3 जणांचा मृत्यू, 60 हून अधिक जखमी
गोव्याची कथा आपल्याला आठवण करून देते की स्वातंत्र्य केवळ जिंकावे लागत नाही, तर ते टिकवून ठेवण्यासाठीही सतत सज्ज राहावे लागते. भारताच्या स्वातंत्र्यानंतरही १४ वर्षे परकीयांच्या ताब्यात राहिलेल्या या भूमीने शेवटी भारतमातेच्या कुशीत स्थान मिळवले आणि आज ती भारतीय ओळखीचा अभिमानास्पद भाग आहे.