Karvenagar Vandevi Information in Marathi
पुण्यातील शहरी भागामध्ये अनेक पुरातन देवीची मंदिरं आहेत. या मंदिरांना शेकडो वर्षांपूर्वीचा इतिहास आहे. नवरात्रोत्सवामध्ये अशी अनेक मध्यवर्ती भागातील पेशवाईच्या काळापासून अस्तित्वामध्ये असणाऱ्या मंदिरांची माहिती जाणून घेतली. आता अशा एका मंदिराबाबत जाणून घेणार आहोत जी देवी 100 किंवा 200 नाही तर 500 वर्षे जुनी आहे. मध्यवर्ती भागापासून लांब असलेली आणि जंगल भागामध्ये येणारी ही देवी म्हणजे वनदेवी. कोथरुड कर्वेनगर परिसराच्या पुढे वनदेवी देवीचे मंदिर असून नवरात्रोत्सावामध्ये भाविकांची मोठी गर्दी दर्शनासाठी होते.
कोथरुड परिसरातील भाविकांमध्ये वनदेवी मंदिर अत्यंत लोकप्रिय आहे. पूर्वी मंदिराचा परिसर हा जंगल भागामध्ये येत होतो. त्यामुळे देवीला देखील वनदेवी असं नाव पडलं असावं. सध्या हा परिसर शहरी भागामध्ये येत असला तरी मंदिर व्यवस्थापकांकडून परिसरामध्ये वृक्षांचे रोपण करण्यात आले आहे. त्यामुळे वनदेवी मंदिर परिसरामध्ये मन अगदी प्रसंग होते. नवरात्रीच्या काळामध्ये पहाटे देवीच्या दर्शनाला येत असतात. नवरात्र व कोजागिरी पोर्णिमेमध्ये मोठा उत्सव पूर्वीपासून आत्तापर्यंत चालू आहे. मंदिराचे बांधकाम हे नवीन असून गाभारा आणि सभागृह अशी मंदिराची रचना आहे. सभागृहामध्ये बसून देवीचे दर्शन घेता येते. वनदेवी मंदिरामध्ये देवीच्या दोन मूर्ती आहेत. यामागे देखील एक आख्यायिका आहे.
वनदेवी मंदिर या परिसरामध्ये मोठी झाडी होती. त्यामुळे हा जंगलसदृश्य परिसर होता. गावातील लोक या टेकडीवर आपल्या गाई-म्हशी घेऊन चरायला आणत असे. या टेकडीवर देवी अवतरली यामागे एक आख्यायिका आहे. या टेकडीवर एक स्त्री रडत बसली होती. तिला तिच्या सासरी मोठा छळ आणि फार सासुरवास केला जात होता. सासू सासऱ्यांच्या जाचाला कंटाळून ती एका मंगळवारी टेकडीवर येऊन बसली होती. सकाळी आलेली ही सुवासिनी स्त्री सकाळापासून रात्रीपर्यंत टेकडीवर दुःख व्यक्त करत रडत होती. यामध्ये दिवस मावळलेला देखील तिच्या ध्यानी आला नाही.
दिवेलागणीच्या वेळी तिच्यासमोर साक्षात देवी प्रगट झाली. देवीने तिची व्यथा ऐकून तिला घरी जाण्यास सांगितले. मात्र तिने नकार देत “मी आता घरी जाणार नाही. मला घरातील लोक फार त्रास देतील. काहीही संशय घेतील. देवी, मी आता तुझ्याजवळ राहणार’ असे सांगितले. तिचा निश्चय पाहून वनदेवी म्हणाली, ” हे सौभाग्यवती, माझ्याजवळ थांब,” असे म्हणून दोघीही टेकडीवर अंतर्धान पावल्या. त्यामुळे आजही वनदेवी मंदिरामध्ये दोन मूर्ती दिसून येतात. मंदिरामध्ये नवरात्री काळामध्ये सजावट आणि उत्सव साजरा केला जातो. मंदिराला फुलांची आकर्षक आरास केली जाते. वनदेवी मंदिराची सेवा बराटे कुटुंबाकडून केली जाते. कर्वेनगर भागातील जागृत देवस्थान म्हणून वनदेवीची आराधना केली जाते.
प्रिती माने