
Know why International Students Day is celebrated
१७ नोव्हेंबर हा दिवस नाझी अत्याचारांत जीव गमावलेल्या विद्यार्थ्यांच्या स्मरणार्थ ‘आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिन’ म्हणून पाळला जातो.
या दिवसाचा उद्देश जगभरातील विद्यार्थ्यांची विविधता, त्यांची आव्हाने आणि त्यांच्या संघर्षांचा गौरव.
आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या भाषिक, सांस्कृतिक व आर्थिक अडचणींची जागतिक पातळीवर नोंद आणि सहानुभूती निर्माण.
International Students Day : दरवर्षी १७ नोव्हेंबर हा दिवस जगभरात आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिन (International Students Day) म्हणून साजरा केला जातो. विद्यार्थ्यांच्या धैर्याची, त्यांच्या संघर्षांची आणि जगभर पसरलेल्या विविधतेची ही आगळीवेगळी पर्वणी आहे. शिक्षणासाठी परदेशात जाणे म्हणजे फक्त एका स्वप्नाचा पाठलाग नाही; तर त्यामध्ये कष्ट, त्याग, मानसिक आव्हाने आणि नव्या संस्कृतीशी जुळवून घेण्याचा दीर्घ प्रवास दडलेला असतो. हा दिवस त्या सर्व विद्यार्थ्यांना सलाम करतो, जे आपल्या भविष्याचा मार्ग स्वतः घडवण्यासाठी धाडसाने पुढे येतात.
आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिनाचा इतिहास अत्यंत वेदनादायी आहे. १९३९ मध्ये प्रागमधील चार्ल्स विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी नाझी क्रूरशाहीविरोधात आंदोलन केले. या आंदोलनानंतर नाझींनी हजारो विद्यार्थ्यांना अटक केली, विद्यापीठ बंद केले आणि अनेकांना ठार मारले. १,२०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी त्या काळात स्वातंत्र्य आणि शिक्षणाच्या मूल्यांसाठी प्राणाची आहुती दिली. याच त्यागाच्या स्मरणार्थ १७ नोव्हेंबर हा दिवस विद्यार्थ्यांच्या सहिष्णूतेचा आणि संघर्षाचा प्रतीक बनला.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Travel News : थेट फ्लाइट्स, सुलभ व्हिसा आणि इंडियन फील; मित्रराष्ट्रातील ‘हे’ शहर बनले आहे भारतीय पर्यटकांसाठी ‘हॉट डेस्टिनेशन’
आजच्या परिस्थितीत हा दिवस आणखी महत्त्वाचा ठरतो. जागतिकीकरणामुळे शिक्षणाची दारे विस्तृत झाली असली तरी आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांवर अनेक प्रकारची ओझी पडतात. भाषेची अडचण, सांस्कृतिक धक्के, आर्थिक ताण, घराची ओढ, या सर्वाशी सामना करत ते स्वतःची ओळख निर्माण करतात. आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिन आपल्याला ही जाण करून देतो की, विविधता ही एक ताकद आहे, अडथळा नाही. जगभरातील शिक्षणसंस्था आज या विविधतेला स्वीकारत आहेत. विविध संस्कृती, विचारसरणी आणि अनुभव एकत्र आल्यानंतर नवोपक्रमाला नवी पंख मिळतात. अनेक अभ्यास दर्शवतात की बहुसांस्कृतिक वातावरणात शिकणारे विद्यार्थी अधिक सर्जनशील, सहानुभूतीपूर्ण आणि समस्यांवर उपाय शोधण्यात पटाईत बनतात.
आजच्या डिजिटल, परस्परजोडलेल्या जगात आपण वेगवेगळ्या देशांतील लोकांशी सतत संवाद साधत असतो. या संवादामुळे एकमेकांविषयी आदर, समज आणि संवेदनशीलता वाढते. हा दिवस आपल्याला आठवण करून देतो की, शिक्षण हे केवळ पुस्तके उघडण्यापुरते मर्यादित नसते; ते मनं आणि संस्कृती एकत्र आणण्याचे सामर्थ्य ठेवते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Social Media Ban : 40 लाख अकाउंट्स निष्क्रिय; ऑस्ट्रेलियात सोशल मीडियावर जगातील पहिली कठोर कारवाई
आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिन हे विद्यार्थ्यांनी केलेल्या त्यागाचा आणि मिळवलेल्या यशाचा जागतिक सन्मान आहे. नवीन देशात जाणे, अनोख्या वातावरणाशी जुळवून घेणे आणि स्वतःची ओळख निर्माण करणे, या प्रत्येक टप्प्यात विद्यार्थी स्वतःला घडवत असतो.
हा दिवस आपल्याला हेही सांगतो की प्रत्येक विद्यार्थी, तो कोणत्याही देशातला असो, स्वप्नांसाठी लढणारा एक योद्धा आहे.