मराठी भाषा दिन: एक सूर एक ध्यास छेडितो मराठी, एक संघ एक बंध गुंजीतो मराठी
“लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी,
धर्म पंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी”
कवी सुरेश भट यांनी लिहिलेल्या या ओळी गाताना आणि ऐकताना अभिमानाने उर भरुन येतो. हे सांगण्यात कारण म्हणजे मराठी भाषा दिनाचं औचित्य. दिग्गज लेखक आणि कवी कुसुमाग्रज म्हणजे विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्मदिन . प्रत्येक मराठी शाळेत कवी कुसुमाग्रजांचा वाढदिवस 27 फेब्रुवारी मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जायचा. आता ही काही प्रमाणात साजरा केला जातो जरी पद्धत बदलली असली तरी. आपल्या देशाची संस्कृतीच ही आहे आईला देवाचा दर्जा दिला जातो. म्हणूनच या माय मराठी मातृभाषेवर असलेलं उदात्त प्रेम, आपुलकी आणि स्नेह हा कवी कुसुमाग्रजांच्या लेखनातून कायमच दिसून आला. साहित्य विश्वात मराठी भाषेच्या बाबतील कुसुमाग्रजांनी मोलाचं कार्य केलं होतं. त्यांनी केलेल्या कार्याबाबत कृतज्ञता व्यक्त करणं या उद्देशाने कुसुमाग्राजांचा जन्मदिन मराठी भाषा दिन म्हणून साजरा करतात.
कुसुमाग्रजांच्या पावलांवर पाऊल ठेवत कला, साहित्य या क्षेत्रात मराठी भाषेसाठी काम करणारे अनेक थोर मंडळी झाले आणि आहेत देखील. नुकताच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला आहे. या अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त होण्यासाठी देखील अनेक राजकीय, सांस्कृतिक, सामाजिक आणि कलाकारांचा देखील मोठा वाटा आहे. अशी ही मायमराठी फक्त व्यावहारीकच नाही तर ग्रामीण भागातील लहेजाने नटलेली आहे. ती कोकणातल्या नारळासारखी मधाळ, पश्चिम महाराष्ट्राच्या लवंगी मिरचीचा ठसका असलेली रांगडी, विदर्भातील आपुलकी, मराठवाड्यातील खमकेपणा या सगळ्यांना अंश असलेली भाषा म्हणजे मराठमोळी मराठी आहे. मध्यंतरीच्या काळात गावकडच्या भाषेला हीन दर्जाची वागणुूक मिळत असे. मात्र यावर वेळोवेळी आवाज उठवल्यानंतर ही हीनपणाची वागणूक देणं कमी झालं.खरंतर प्रमाण भाषा म्हणजे पुर्णत: मराठी भाषा नव्हे हे साहित्य विश्वातील मातब्बर मंडळींनी दाखवून दिलं. कवयित्री शांता शेळके, ना. धो. महानोर. आण्णा भाऊ साठ्ये, नामदेव ढसाळ .यांच्या सारख्या लेखकांनी गावतल्या भाषेला जीवंतपणा दिला. हीच परंपरा पुढे नेणारे, संजय कृष्णाजी पाटील, किशोर कदम, नागराज मंजुळे हे कलाकार मंडळींनी रांगड्या माय मातीचं असणं चित्रपट , नाटक आणि कथा कांदबऱ्य़ामधून जपत आहेत.
एकीएकडे मराठी भाषा मराठी नाटकं हे लयाला गेली अशी बोंब होत असताना नागराज मंजुळेंसारखा मातीतला कलाकार हा फॅंड्री, पिस्तुल्या, नाळ, पावसाचा निबंध आणि सैराटसारख्या ग्रामीण जीवनावर भाषेवर सिनेमाच्या माध्यमातून प्रकाश टाकतो आणि थेट हा महाराष्ट्राच्या मातीतला सिनेमा ऑस्कर पर्यंत जातो. दिग्दर्शक रवी जाधवांनी नटरंग साकारला तेव्हा गुणा कागलकर या तमाशा कलावंताच्या आयुष्याची कहाणी सर्वसामन्यांनी उचलून धरली. मराठी नाटकांचा जमाना आता राहिला नाही असं म्हणणाऱ्यांसमोर लेखक प्राजक्त देखमुख यांनी संगीत देवबाभळी सारखा अविष्कार सादर केला. पंढरीचे माय बाप विठु रखुमाई आणि अभंगातून भक्ती, करुणा, अंधश्रद्धेविरोधात आवाज उठवणारे तुकोबा आणि घराची सावली आणि संसारासाठी समर्पण करणारी आवली यांच्या आयुष्याची अभंगाथा सांगणारं देवबाभळी नाटकाचे प्रयोग फक्त भारतच नव्हे अमेरिका, कॅनडा या ठिकाणी देखील करण्यात आले. मग्न तळ्याकाठी, वाडा चिरेबंदी, आरण्यक या अलीकडच्या काळातील मराठी नाटकांनी देशातच नव्हे तर परदेशातही मराठीचा डंका वाजवला आहे. मराठी भाषा म्हणजे संतांची अमृतवाणी, छत्रपती शिवरायांच्य़ा हातातील तलवार, अन्यायाविरोधात आवाज उठण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकारांच्या हातातील धारदार लेखणी, अशी ही मायमराठी भाषा विविधतेने नटलेली असूनही एकता आणि समता जपणारी आहे.