
चंद्रावरच नव्हे, सूर्यावरही पिंपल्स! पुढील दहा दिवस दिसणार दुर्मीळ खगोलीय दृश्य
सूर्यावरील डाग पाहण्यासाठी थेट कोणत्याही दुर्बिणीचा वापर धोकादायक ठरतो
सूर्यावर एकाचवेळी मोठ्या संख्येने आणि अत्यंत विशाल आकाराचे सनस्पॉट्स
काळसर ठिपके पृथ्वीपेक्षा अनेक पटींनी मोठे
सोनाजी गाढवे/ पुणे चंद्रावर डाग किंवा खळ्यांची कवीकल्पना सुंदर असली तरी, सूर्यावरही अशा पिंपल्स मोठ्या संख्येने दिसत आहे. यासंदर्भातील निरीक्षण आणि छायाचित्र नासाने प्रसिद्ध केल्याची माहिती नेहरु सेंटरच्या नेहरु तारांगणाच्यावतीने देण्यात आली आहे. सूर्यावर एकाचवेळी मोठ्या संख्येने आणि अत्यंत विशाल आकाराचे सनस्पॉट्स (सूर्यडाग) दिसत आहेत. सूर्याच्या पृष्ठभागावर दिसणारे हे काळसर ठिपके पृथ्वीपेक्षा अनेक पटींनी मोठे असून, हा प्रकार खगोलशास्त्रात (science news) दुर्मीळ मानला जातो. वैज्ञानिकांच्या मते, हे महाकाय सनस्पॉट्स पुढील सुमारे दहा दिवस स्पष्टपणे पाहता येतील.
याआधी अशा प्रमाणात मोठे सनस्पॉट्स १९४७ आणि २०१४ मध्ये दिसले होते. या डागांमुळे सूर्यातून शक्तिशाली “एक्स-क्लास सोलर फ्लेअर्स” निर्माण होऊ शकतात. कधी कधी या प्रक्रियेतून कोरोनल मास इजेक्शन (सीएसई) होते, ज्यामध्ये सूर्य विद्युतभारित कण अवकाशात वेगाने फेकतो. हे कण पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राशी भिडल्यावर उत्तर आणि दक्षिण ध्रुवीय भागात सुंदर ऑरोरा म्हणजेच ध्रुवीय प्रकाश दिसतो.
सनस्पॉट्सचे तापमान साधारण ४,०००°C असते, तर सूर्याच्या फोटोस्फिअरचे तापमान ६,३००°C असते. त्यामुळे हे तुलनेने थंड असल्याने काळसर दिसतात. त्यांच्या मध्यभागाला अंब्रा आणि भोवतालच्या भागाला पेनअंब्रा म्हणतात. काहीवेळा विशेष परिस्थितीत अंब्रा लालसर आणि पेनअंब्रा केशरी दिसू शकतात. नासाच्या सोलर डायनॅमिक ऑब्झर्व्हेटरीने (एसडीओ) घेतलेल्या छायाचित्रांमध्ये हे सर्व तपशील स्पष्ट दिसत आहेत. सूर्याचा आकार पृथ्वीपेक्षा सुमारे १०८ पट मोठा असल्याचेही निरीक्षणात दिसते.
हा आविष्कार कसा पाहावा?
सूर्याकडे कधीही उघड्या डोळ्यांनी पाहू नये. तसेच सूर्यावरील डाग पाहण्यासाठी थेट कोणत्याही दुर्बिणीचा वापर धोकादायक ठरतो. त्यासाठी सूर्याची प्रतिमा पडद्यावर घेऊन त्याचे निरीक्षण करावे. सनस्पॉट्स पाहण्यासाठी क्रमांक १४ किंवा त्यापुढील वेल्डरचे चष्मे, सुरक्षित इक्लिप्स गॉगल्स किंवा दुर्बिणीतून सूर्याची प्रतिमा पडद्यावर टाकून निरीक्षण करावे. सध्या सुरू असलेले सौरचक्र २०२५ मध्ये सोलर मॅक्सिमम टप्प्यावर असल्यानेच हे महाकाय आणि अनेक सनस्पॉट्स एकाचवेळी दिसत असल्याचे मत नेहरु सेंटरच्या नेहरु तारांगणचे संचालक अरविंद परांजपे यांनी व्यक्त केले आहे.
काही आश्चर्यकारक निरीक्षणे
– सूर्यावरील डागांचे पहिले निरीक्षण चीनच्या खगोलशास्त्रज्ञांनी इसवी पूर्व २८ मध्ये नोंदिवले होते. त्यातुलनेत ११२८ मध्ये सूर्यावरील डागांचे चित्र काढले होते.
– १५६०-१९२१ या काळात खगोलशास्त्रज्ञ थॉमस हॅरियट आणि इटालियन गॅलिलिओ गॅलिली (१५६४-१६४२) यांनी स्पष्ट निरीक्षणे घेतली.
– दर अकरा वर्षांनंतर सूर्यावरील डागांचे प्रमाण बदलते.
– ज्या वर्षात सर्वाधिक डाग दिसतात, त्याला सोलार मॅक्झिमम म्हणतात. सोलार मिनिमम ही अवस्था साडेपाच वर्षांनंतर एकदा येते. या काळात कित्येक आठवडे सूर्यावर एकही डाग दिसत नाही.
– सूर्यावरील डाग हे शक्तीशाली चुंबकीय क्षेत्राने भारलेले असतात.
– सध्या सूर्यावरील डाग अधिक तीव्रतेने दिसून येते आहे.