national reading day 2025 how to build reading habit in busy life
National Reading Day 2025 : दरवर्षी १९ जूनला भारतात राष्ट्रीय वाचन दिन (National Reading Day) साजरा केला जातो. हा दिवस केवळ वाचनाचा सन्मान करण्यापुरता मर्यादित नसून, भारतात साक्षरतेचा पाया रचणारे आणि “ग्रंथालय व साक्षरता चळवळीचे जनक” म्हणून ओळखले जाणारे पुथुवायिल नारायण पणिकर (पी. एन. पणिकर) यांना अभिवादन करण्याचा हा दिवस आहे.
केरळमध्ये वाचन संस्कृती निर्माण करण्याचे श्रेय प्रामुख्याने पी.एन. पणिकर यांना जाते. १९२६ मध्ये त्यांनी जनतेसाठी पहिले सार्वजनिक ग्रंथालय सुरू केले “सनदानधर्मम पुस्तकालय”. पुढे त्यांनी शेकडो ग्रंथालये स्थापन करण्याचा मार्ग मोकळा केला. १९४५ मध्ये त्रावणकोर ग्रंथालय संघटना स्थापन झाली आणि त्याच्याच पुढील रूप म्हणजे केरळ ग्रंथशाला संघम. पणिकर यांच्या अथक प्रयत्नांमुळे केरळ आज भारतातील सर्वाधिक साक्षरतेचे राज्य म्हणून ओळखले जाते. १९९५ मध्ये त्यांच्या निधनाच्या दिवशी, म्हणजे १९ जून रोजी, केरळमध्ये वाचन दिन साजरा करण्याची सुरुवात झाली. २०१७ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याला राष्ट्रीय स्वरूप दिले आणि तेव्हापासून हा दिवस संपूर्ण देशात राष्ट्रीय वाचन दिन म्हणून ओळखला जातो.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : International Charity Day : या खास दिवशी वाचा मदर तेरेसा यांचे 10 प्रेरणादायी सुविचार सोबतच इतिहास आणि महत्त्व
आजच्या डिजिटल युगात पुस्तके वाचण्याची सवय हळूहळू कमी होत आहे. मोबाइल, सोशल मीडिया, लघुरूप माहिती यांच्या गर्दीत सखोल वाचनाची परंपरा मागे पडताना दिसते. अशा वेळी राष्ट्रीय वाचन दिन आपल्याला आठवण करून देतो की ज्ञानाचा खरा खजिना अजूनही पुस्तकांच्या पानांत दडलेला आहे. वाचन केवळ माहिती देत नाही तर व्यक्तिमत्त्व घडवते, विचारांना धार लावते, कल्पनाशक्ती वाढवते आणि जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलते. हा दिवस म्हणजे पुन्हा एकदा पुस्तकांच्या प्रेमात पडण्याचा उत्सव आहे.
पुस्तकांची सवय लावणे म्हणजे एक प्रवास आहे. सुरुवातीला अवघड वाटू शकते पण हळूहळू ही सवय जीवनाचा अविभाज्य भाग बनते. काही सोपे उपाय पुढीलप्रमाणे –
दररोज ठराविक वेळ ठेवा : झोपण्यापूर्वी १५-२० मिनिटे पुस्तक वाचा.
आवडत्या विषयापासून सुरुवात करा : इतिहास, कादंबरी, विज्ञान, स्व-विकास अशा तुमच्या आवडीच्या शैलीची पुस्तके निवडा.
लहान पुस्तकांपासून सुरुवात करा : एकदम मोठ्या ग्रंथाऐवजी लघुकथा, निबंध संग्रह वाचा. यामुळे आत्मविश्वास वाढतो.
ऑनलाइन वाचन मंचात सामील व्हा : Goodreads, स्थानिक वाचन गट किंवा ग्रंथालय क्लबमध्ये सहभागी व्हा.
वाचनाची नोंद ठेवा : वाचलेल्या पुस्तकांची यादी तयार करा. प्रगती दिसल्यावर प्रेरणा मिळते.
इतरांसोबत चर्चा करा : मित्र किंवा कुटुंबासोबत पुस्तकातील कथा, विचार शेअर करा.
मोबाइलचा उपयोग करा : जर पुस्तक जवळ नसेल तर ई-बुक किंवा ऑडिओबुकचा आधार घ्या.
धीर धरा : एखादे पुस्तक पहिल्या प्रकरणातच कंटाळवाणे वाटले तरी थोडा वेळ द्या. कधी कधी खरी गंमत पुढे दडलेली असते.
ग्रंथालयाची सवय लावा : सार्वजनिक ग्रंथालयात गेल्यावर आपोआप वाचनाची गोडी लागते.
लहान मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण करा : कथा सांगणे, रंगीत पुस्तकं देणे, यामुळे पुढील पिढीही वाचनप्रेमी होईल.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : National Wildlife Day 2025 : निसर्गाशी सहअस्तित्वाचे वचन! वाचा लुप्त होत जाणाऱ्या प्रजातींचे संरक्षण का आहे गरजेचे?
जग माहितीच्या महासागरात बुडालं आहे, पण खरी माहिती आणि खोट्या माहितीमध्ये फरक करण्यासाठी सखोल वाचन आणि चिकित्सक दृष्टी आवश्यक आहे. पुस्तकं हीच आपल्याला विचारांची शिस्त, ज्ञानाची खोली आणि संवादाची समृद्धी देतात. म्हणूनच राष्ट्रीय वाचन दिन हा केवळ एक दिवस नाही तर वाचनाची आजीवन प्रेरणा आहे.