आंतरराष्ट्रीय धर्मादाय दिन २०२५ : मदर तेरेसा यांचे अद्वितीय जीवन, महत्त्व आणि प्रेरणादायी विचार ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
International Charity Day 2025 : मानवतेचा खरा धर्म कोणता? हा प्रश्न विचारला तर प्रत्येक उत्तर फक्त एकाच दिशेकडे जाते: दानधर्म व करुणा. 5 सप्टेंबर हा दिवस जगभरात आंतरराष्ट्रीय धर्मादाय दिन (International Charity Day) म्हणून साजरा केला जातो. हा दिवस विशेष आहे कारण हाच दिवस मानवतेची मूर्ती मानल्या गेलेल्या मदर तेरेसा यांच्या पुण्यतिथीचा दिवस आहे.
१९१० मध्ये स्कोप्जे (आजचे उत्तर मॅसिडोनिया) येथे जन्मलेल्या अॅग्नेस गोंझा बोयाझ्यू या मुलीने पुढे संपूर्ण जगाला “मदर तेरेसा” म्हणून ओळख मिळवून दिली. १९५० मध्ये त्यांनी कोलकाता येथे मिशनरीज ऑफ चॅरिटीची स्थापना केली. या संस्थेचे उद्दिष्ट होते “गरीब, अनाथ, आजारी आणि मरणासन्न लोकांची नि:स्वार्थ सेवा.” ४५ वर्षांहून अधिक काळ मदर तेरेसा यांनी असंख्य गरजूंच्या आयुष्यात प्रकाश आणला. त्यांचे कार्य केवळ भारतापुरते मर्यादित राहिले नाही, तर जगभर त्यांच्या करुणेची ज्योत पोहोचली. त्याच सेवाभावासाठी त्यांना १९७९ मध्ये नोबेल शांतता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
मदर तेरेसा यांच्या पुण्यतिथीच्या दिवशीच धर्मादाय कार्यांचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी संयुक्त राष्ट्र महासभेने २०१२ मध्ये ५ सप्टेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय धर्मादाय दिन म्हणून घोषित केला. हा उपक्रम हंगेरियन नागरी समाज आणि सरकारच्या सहकार्याने २०११ मध्ये सुरू झाला होता. यामागील हेतू असा होता की जगातील प्रत्येक व्यक्तीने आपल्या क्षमतेनुसार समाजातील दुर्बल घटकांना मदत करावी.
हे देखील वाचा : Teachers Day 2025: डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यामुळे 5 सप्टेंबर हा दिवस शिक्षकांसाठी कसा ठरला खास? जाणून घ्या
गरिबी, भूक, आजारपण यांसारख्या समस्या दूर करण्यासाठी सामूहिक प्रयत्नांना प्रोत्साहन मिळते.
धर्मादाय उपक्रमांतून आरोग्य, शिक्षण, बालसंरक्षण, अन्नसुरक्षा यांसारख्या मूलभूत गरजांवर लक्ष केंद्रित करता येते.
समाजात समानता, मानवी मूल्ये आणि उदारतेची भावना दृढ होते.
तरुण पिढीला “सेवेतच समाधान आहे” हा महत्त्वाचा धडा मिळतो.
१. “जर तुम्ही लोकांचा न्याय केला तर तुम्हाला त्यांच्यावर प्रेम करण्यासाठी वेळ मिळणार नाही.”
२. “शांतीची सुरुवात हास्याने होते.”
३. “आपण सर्व महान गोष्टी करू शकत नाही; पण आपण मोठ्या प्रेमाने लहान गोष्टी करू शकतो.”
४. “दयाळू शब्द लहान आणि बोलायला सोपे असतात; पण त्यांचे प्रतिध्वनी अंतहीन असतात.”
५. “सर्वात भयानक गरिबी म्हणजे एकटेपणा आणि कोणीही आपल्यावर प्रेम करत नाही ही भावना.”
६. “आपण किती देतो हे महत्त्वाचे नाही, आपण किती प्रेमाने देतो हे महत्त्वाचे आहे.”
७. “काल गेला आहे, उद्या अजून आलेला नाही. आपल्याकडे फक्त आज आहे – चला सुरुवात करूया.”
८. “प्रत्येक हसू हे प्रेमाचे कृत्य आहे, एक भेट आहे, एक सुंदर गोष्ट आहे.”
९. “खरे प्रेम शोधण्यासाठी तुम्हाला असाधारण असण्याची गरज नाही; तुम्ही थकल्याशिवाय प्रेम करा.”
१०. “भविष्याची भीती आपल्याला फक्त तेव्हाच वाटते जेव्हा आपण आज वाया घालवतो.”
हे देखील वाचा : पुण्याच्या अंतःकरणात लपलेलं आहे ‘हे’ गणपती मंदिर; जाणून घ्या भक्तांसाठी का आहे खास आणि विलक्षण?
आंतरराष्ट्रीय धर्मादाय दिन हा केवळ एक स्मरणदिन नाही, तर मानवतेला कृतीत उतरवण्याची प्रेरणा आहे. या दिवशी प्रत्येक व्यक्तीला स्वतःमध्ये विचार करायला हवा मी इतरांसाठी काय करू शकतो? गरजूंच्या डोळ्यांत आनंदाचे अश्रू आणणे, एखाद्या भुकेल्या मुलाला अन्न देणे, एकाकी वृद्धांना आधार देणे हीच खरी दानधर्माची व्याख्या आहे. मदर तेरेसा यांचे जीवनच या विचाराचे मूर्तिमंत उदाहरण होते.