Diwali 2025: दिवाळी सण माणसांसाठी आनंदाचा मात्र पक्ष्यांसाठी ठरतोय 'कर्दनकाळ'; नेमके कारण काय?
दिवाळीनिमित सर्वत्र आनंदाचे, उत्साहाचे वातावरण
फटाक्यांच्या आवाजामुळे पक्षी/प्राण्यांना होतोय त्रास
निसर्गातील सजीवांसाठी ‘कर्दनकाळ’ ठरतोय फटाक्यांचा आवाज
सुनयना सोनवणे/पुणे: दिवाळी हा प्रकाशाचा आणि आनंदाचा सण असला तरी फटाक्यांच्या कर्णकर्कश आवाजामुळे आणि विषारी धुरामुळे हा सण निसर्गातील सजीवांसाठी ‘कर्दनकाळ’ ठरतो आहे . शांत, निसर्गरम्य वातावरणात जीवन जगणाऱ्या पक्ष्यांना मोठ्या आवाजाची सवय नसते. दीपोत्सव सुरू होताच सर्वत्र फटाक्यांचा गडगडाट सुरू होतो. त्यातून निर्माण होणारे ध्वनी व वायू प्रदूषण प्राणी – पक्ष्यांच्या जीवावर बेतते.
झाडांवर विश्रांती घेत असताना अचानक फटाके फुटल्याने पक्षी घाबरून उडतात. अंधारात दिशाभूल होऊन इमारतींना, तारा किंवा झाडांना धडकतात आणि गंभीर जखमी होतात. काही मृत्युमुखी पडतात, तर अनेक बेघर होतात. फटाक्यांच्या मोठ्या आवाजामुळे त्यांच्या श्रवणशक्तीवर परिणाम होतो आणि काही पक्षी बहिरे होतात. हवेतील सल्फर डायऑक्साइड आणि नायट्रोजन डायऑक्साइडसारखे घातक वायू त्यांच्या श्वसनसंस्थेत जाऊन श्वास घेण्यास त्रास निर्माण करतात, असे पशुवैद्य डॉ. कुणाल मुनाळे यांनी नवराष्ट्राशी बोलताना सांगितले.
फटाक्यांचा हा फटका फक्त पक्ष्यांनाच नाही तर पाळीव व भटके प्राण्यांनाही बसतो. घरातील कुत्रे-मांजरी फटाक्यांच्या आवाजाने घाबरून घराच्या कोपऱ्यात लपतात, थरथर कापतात, अन्न नाकारतात, तर काही बाहेर पळून हरवतात. भीतीमुळे त्यांच्या शरीरातील संप्रेरकांमध्ये असंतुलन निर्माण होऊन लघवी वारंवार होणे, भूक मंदावणे असे परिणाम दिसतात.
Diwali 2025: दिवाळीत या शुभ मुहूर्तावर करा लक्ष्मीपूजन, जाणून घ्या पूजेसाठी मुहूर्त, पूजा पद्धत
डॉ. मुनाळे यांच्या म्हणण्यानुसार फटाक्यांमुळे प्राण्यांवर मानसिक, शारीरिक आणि आरोग्याच्या समस्या वाढतात. दर वर्षी अनेक कुत्रे आणि मांजरी डोळ्यांच्या इन्फेक्शनने त्रस्त असल्याचे निदर्शनास येते. फटाक्यांमुळे वायू प्रदूषणाबरोबरच ध्वनी, माती आणि जलप्रदूषणही वाढते. त्यातून निघणारे सूक्ष्म कण (पीएम २.५आणि पीएम १०) फुफ्फुसात व रक्तप्रवाहात प्रवेश करून गंभीर आजारांना आमंत्रण देतात. फटाक्यांच्या अवशेषांमुळे माती व जलस्रोत दूषित होतात.
फटाक्यांच्या ध्वनीप्रदूषणामुळे वन्यजीव आणि पाळीव प्राण्यांच्या जीवनचक्रावर विपरीत परिणाम होतो. मोठ्या आवाजाने घोडे, गुरेही दचकतात आणि स्वतःला इजा पोहोचवतात. झाडांखाली फटाके उडवल्याने पक्ष्यांचा जीव जातो किंवा त्यांना भाजल्यामुळे दुखापत होते. काही वेळा जळत्या फटाक्यांचे तुकडे झाडांवर पडून आगीच्या दुर्घटनाही घडतात.
फटाक्यांच्या संपर्कानंतर पक्ष्यांमध्ये दिसणारी लक्षणे
१. अचानक अस्वस्थता किंवा घाबरून भरारी घेणे
२. भीतीमुळे थरथरणे किंवा बेशुद्ध पडणे
३. हृदयाचे ठोके वाढणे (टॅकीकार्डिया)
४. तोंड उघडे ठेवून श्वास घेणे किंवा धापा टाकणे
५. श्वास घेण्यास त्रास होणे, आवाजासह श्वसन
६. अशक्तपणा किंवा निष्क्रियता
७. धडक बसल्यामुळे पंख किंवा पाय मोडणे
८. जखमेमुळे नाक किंवा तोंडातून रक्त येणे
९. धूर/स्फोटामुळे त्रास डोळे सुजणे, मिटणे किंवा पाणी येणे
१०. पिसे विस्कटणे आणि भूक कमी होणे
११. दिशाभूल होणे किंवा फांदीवर बसता न येणे
१२. तीव्र ताणामुळे अचानक मृत्यू होणे
फटाक्यांमुळे पक्ष्यांना होणारे प्रमुख शारीरिक नुकसान
१. धक्का आणि अचानक मृत्यू – तीव्र भीतीमुळे हृदयविकाराचा झटका येणे.
२. पंख किंवा पायाचे फ्रॅक्चर – घाबरून भरारी घेताना भिंतींना किंवा झाडांना धडकणे.
३. डोके किंवा चोचीच्या जखमा – कठीण वस्तूंवर आदळल्यामुळे.
४. आतील रक्तस्त्राव – जोरदार धक्क्यामुळे होणारी अंतर्गत दुखापत.
५. श्वसनाचा त्रास – धूर व विषारी वायू श्वसनमार्गात गेल्यामुळे.
६. भाजणे – फटाक्यांच्या ज्वाळा किंवा पडलेल्या ठिणग्यांमुळे.
७. डोळ्यांच्या जखमा (कंजंक्टिव्हायटिस, कॉर्नियल बर्न, अंधत्व) – धूर किंवा ठिणग्यांच्या संपर्कामुळे.
८. पिसे जळणे – जवळच्या स्फोटामुळे.
९. पिल्ले अनाथ होणे – भीतीमुळे पालक पक्षी घरटे सोडून पळतात.
१०. भूक न लागणे व थकवा – ताण, धूर किंवा विषारी पदार्थांच्या संपर्कामुळे.
११. दिशाभूल आणि असंतुलन – डोक्याच्या दुखापतीमुळे किंवा मानसिक ताणामुळे.
१२. थकव्यामुळे मृत्यू – दीर्घकाळ उडण्यामुळे किंवा पळून जाण्याच्या प्रयत्नात.