pune city police damini pathak sonali hinge marathi information navratri special pune news
प्रिती माने : मोठ्या उत्साहामध्ये आपण नवरात्रोत्सव साजरा करत आहोत. यानिमित्ताने देवीची विविध रुप पुजली जात आहेत. नऊ दिवस हा देवीचा गजर आणि जागर सुरु असतो. पण हे फक्त नऊ दिवसच का असा प्रश्न नक्की मनामध्ये उत्पन्न होतो. नवरात्रीच्या सणानंतर देवीच्याच अंश असलेल्या महिलांचे काय? आपल्या आसपास असणाऱ्या स्त्रीच्या सुरक्षेचे काय? फक्त नऊ दिवस नाही तर कायम महिलांच्या सुरक्षेसाठी आणि तिच्या रक्षणासाठी कार्यरत राहते दामिनी. आज पुण्यातील महिलांचे, विद्यार्थींनीचे दामिनी पथक हे सुरक्षा कवच ठरले आहे.
दामिनी पथक देवी दुर्गेचे रुप धारण करुन महिलांना सुरक्षा देत आहे. महिला आज पुढे जात आहेत. पुरुषांच्या बरोबरी सर्वच क्षेत्रात उत्तुंग काम करुन भरारी घेत आहे. तिच्या पंखांना बळ देणारे अनेक हात आज आहेत. तिच्या स्वतःच्या पायावर उभं राहण्यास जीव तोडून प्रयत्न करत आहेत. मात्र त्याचबरोबर समाजामध्ये अशीही एक राक्षसी प्रवृत्ती आहे ती हे पंख छाटण्याचा प्रयत्न करत आहे. उमलत आलेले फुल कोमजण्याचा प्रयत्न काही नरधमांकडून केला जातो. त्याच्याविरोधात दुर्गेचे रुप धारण करतात त्या महाराष्ट्र महिला पोलीस. पोलीस दलातून पुण्यामध्ये दामिनी पथक तयार करण्यात आले आहे. दामिनी पथक सर्व वयोगटातील महिलांना आणि खास करुन किशोरवयीन मुलींचे रक्षण हे दामिनी पथक करत आहे. नवरात्रीच्या निमित्ताने नवराष्ट्र नवदुर्गा या विशेष कार्यक्रमामध्ये दामिनी पथक मार्शल सोनाली हिंगे यांची विशेष मुलाखतीतून दामिनींचे हे कार्य जाणून घेऊया…
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुणे शहर पोलीस दलाकडून महिला पोलिसांचे दामिनी पथक तयार करण्यात आले. प्रत्येक पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक किंवा महिला पोलिसांचे हे दामिनी पथक आहे. दामिनी पथकाच्या माध्यमातून महिलांना स्वरक्षाणाचे धडे दिले जातात. शाळांमधील विद्यार्थींनीना प्रशिक्षण दिले जाते. प्रत्येक वर्गामध्ये जाऊन दामिनी दीदी संवाद साधतात. मुलींमध्ये एक विश्वास निर्माण करत असतात, अशी माहिती सोनाली हिंगे यांनी दिली.
सोनाली हिंगे या शिवाजीनगर हद्दीमधील दामिनी मार्शल आहेत. या हद्दीमध्ये येणाऱ्या प्रत्येक शाळेमध्ये त्यांनी जाऊन प्रशिक्षण दिले आहे. कॉलेजमधील विद्यार्थ्यांच्या कार्यशाळा घेतल्या आहेत. शाळांमधील प्रत्येक विद्यार्थ्यांच्या वहीमागे शेवटच्या पानावर नंबर दिला जातो. त्यामुळे कधीही कोणतीही परिस्थिती आली तरी विद्यार्थी मोठ्या विश्वासाने सोनाली दीदी यांना कॉल करतात. अगदी हक्काचे माणूस म्हणून विद्यार्थींनींना सोनाली यांचा आधार वाटतो. पोलीसांसोबत शालेय मुलींची ही मैत्री सुदृढ समाजनिर्मितीसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण आत्तापर्यंत समाजामध्ये एक आदरयुक्त भीती राहिली आहे. मात्र या भीतीपोटी अनेकजण आपल्या व्यथा व्यक्त करत नाही. त्यामुळे गुन्हे समोर येत नाही. दामिनी पथकाच्या माध्यमातून मुली या सर्व दीदींसोबत अगदी विश्वासाने सर्व अनुभव सांगत असल्याची बाब सोनाली हिंगे यांनी नमूद केली.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
शिवाजीनगरमधील एका शालेय विद्यार्थींनीचा प्रसंग सोनाली हिंगे यांनी आवर्जून सांगितला. इंग्रजी माध्यमातील नामांकित शाळेत दहावीच्या वर्गातील विद्यार्थींनी सोनाली दीदींना रडत फोन केला आणि मदत पाहिजे असे अगदी हक्काने सांगितले. त्या मुलीचे वडील क्लास वन अधिकारी तर आई उच्चशिक्षित गृहिणी होती. एकुलती एक असलेली ती मुलगी वर्गातील हुशार आणि टॉपर विद्यार्थीनी होती. मात्र घरी सुरु असलेल्या वादामुळे तिच्या बालमनावर मोठा आघात झाला होता. या विद्यार्थींनीचे पालक घटस्फोट घेऊन विभक्त होत असल्यामुळे ती मोठ्या मानसिक त्रासातून जात होती. सोनाली हिंगे यांनी शाळेत मार्गदशन पर शिबीर घेत काही अडचण असल्यास सांगण्याचे आवाहन केले. यानंतर त्या मुलीने रडत रडत त्यांना फोन केला अन् “दीदी, मला तुमच्या मदतीची गरज आहे”, अशी विनंती केली.
आई-वडील विभक्त होत असल्यामुळे ही मुलगी घर सोडून चालली होती. तिने सर्व हकीकत ही सोनाली दीदीसमोर सांगितली आणि त्यांनी तिला आश्वास्त करत शांत केले. तिची मनस्थिती जाणून घेत तिच्या पालकांची भेट घेतली. मुलीची व्यथा ऐकून सोनाली हिंगे यांनाच गहिवरून आले आणि तिच्या पालकांना त्यांनी मनाची घालमेल दाखवून दिली. तेव्हा आई-वडीलही मुलीच्या प्रेमापुढे झुकले. त्यांनी त्याक्षणी घटस्फोटाचा निर्णय बदलत पुन्हा एकत्र येण्याचा निर्णय घेतला. दामिनी मार्शलमुळे एक कुटुंब विभक्त होण्यापासून वाचले आणि मुलीला तिचे आई-वडील पुन्हा मिळाले.
समाजातील ही संवेदनशीलता जाणून घेत सर्वांना मदतीचा हात देणारे दामिनी पथक ठरले आहे. सोनाली हिंगे यांनी फक्त किशोरवयीन नाही तर लहान लहान मुलांना देखील चुकीचा स्पर्श, वाईट स्पर्श आणि मायेचा स्पर्श यातील फरक सांगितला आहे. त्याचबरोबर अपंग आणि दिव्यांग मुलींना देखील त्यांनी स्वरक्षणाचे धडे दिले आहे. प्रत्येक स्तरातील आणि प्रत्येक वयोगटातील मुलींसाठी दामिनी पथक एक सुरक्षा कवच बनले आहे. नवरात्रीच्या निमित्ताने घेतलेल्या खास मुलाखतीमध्ये सोनाली हिंगे यांनी सर्व महिलांना दामिनी पथकाला कोणत्याही संकटकाळी एक कॉल करण्याचे आवाहन केले.