pune Shukrawar Peth Uma Maheshwar Temple marathi information
Shravan 2025 : प्रिती माने : पवित्र मानल्या जाणाऱ्या श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे. सृष्टीमध्ये नवचैतन्य निर्माण करणाऱ्या या श्रावणमासामध्ये भगवान शिवाची आराधना केली जाते. पुण्यासारख्या सांस्कृतिक वैभव लाभलेल्या शहरामध्ये महादेवाची अनेक प्राचीन आणि स्थापत्यशैलीचा उत्तम नमुना असलेली मंदिरे अस्तित्वात आहेत. तर काही मंदिरांचा जिर्णोद्धार करुन त्यांना नव्याने आकार दिला जातो आहे. असेचे एक प्राचीन पण नव्या थाटनीचे मंदिर म्हणजे उमा महेश्वर.
शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये शुक्रवार पेठेत हे उमा महेश्वर मंदिर आहे. लोकवस्तीच्या गर्दीमध्ये हरवलेले हे मंदिर पुन्हा एकदा नावारुपास आले आहे. याचे कारण म्हणजे मंदिराचे नव्याने केलेले बांधकाम. उमा महेश्वर मंदिराचा मूळ गाभारा कायम ठेवत मंदिराच्या परिसराचे दगडी बांधकाम करण्यात आले आहे. मराठा शैलीमध्ये या मंदिराचे स्थापत्य साकारण्यात आले असून ते अतिशय मनमोहक दिसून येत आहे. मराठा पद्धतीच्या कमानी, झरोके आणि देवळ्या तसेच मराठा पद्धतीची कमानीवरील केळंफुल हे सुबक शैलीमध्ये कोरण्यात आले आहेत. ललाटबिंबावर गणराय असून नक्षीकाम असलेले द्वारशाखा आहेत.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
मंदिराच्या चहूबाजूने आवारामध्ये दगडी ओटा बांधण्यात आला असून कौलारु छत याची शोभा वाढवत आहे. त्याचबरोबर गाभाऱ्याच्या अगदी समोर भैरवाची अत्यंत देखणी मूर्ती आहे. त्यासमोर असलेले दगडी कारंजे हे मंदिराच्या सौंदर्यात भर घालतात. त्याचबरोबर आवारातील भिंतीवर अनेक देवदेवतांची ओवरी भिंतीचित्रे रेखाटण्यात आली आहेत. शहरातील गोंगाटाच्या भागामध्ये असूनही मंदिराच्या आवारामध्ये असणारी निरव शांतता मनाला प्रफुल्लित करते.
उमा महेश्वर मंदिराचे मराठा स्थापत्य शैलीतील बांधकाम अतिशय मनमोहक आहे (फोटो –
टीम नवराष्ट्र)
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
बांधकाम हे नव्याने साकारण्यात आले असले तरी हे मंदिर प्राचीन आहे. सुमारे 180 वर्षापुर्वी बांधलेले श्री उमामहेश्वर मंदिर काळाच्या ओघात दुर्लक्षित झाले होते. आता मात्र मराठा शैलीमध्ये याचा जिर्णोद्धार करण्यात आला असून मंदिराला नव्याने वैभव प्राप्त झाले आहे. गाभाऱ्यातील शिवलिंग हे मूळ स्वरुपामध्ये असून देवकोष्टांमध्ये सुर्यनारायण, विष्णुलक्ष्मी, गणपती आणि दुर्गामाता यांच्या सुबक अशा काळ्या पाषाणातील मूर्ती आहेत. त्याचबरोबर मध्यभागी गाभाऱ्यामध्ये असणारी श्री उमामहेश्वराची मूर्ती लक्ष वेधून घेते. मंदिरामधील शांतता आणि स्थापत्यशैली ही उमामहेश्वर शिवमंदिराचे वैशिष्ट्य ठरते आहे. प्रदोष आणि सोमवारी मंदिरामध्ये भक्तांचा ओढा वाढतो. शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये असणारे उमा महेश्वर मंदिर हे मराठा स्थापत्य शैलीचा ठेवा म्हणून समोर आले आहे.