
प्रभाग 9 साठी राष्ट्रवादीचा प्रगती अहवाल अन् ‘जनहितनामा’ प्रसिद्ध
यावेळी प्रभाग क्रमांक ९ मधील जनतेच्या हिताचा “जनहितनामा” देखील प्रसारित करण्यात आला. नागरिकांच्या दैनंदिन गरजा, परिसरातील प्रमुख समस्या, आणि पुढील काळातील प्राधान्यक्रम लक्षात घेऊन सर्वंकष दृष्टिकोनातून हा जनहितनामा तयार करण्यात आला असल्याचे उपस्थितांनी सांगितले. मूलभूत सुविधा, सुरक्षितता, वाहतूक व्यवस्थापन, स्वच्छता, पाणीपुरवठा, ड्रेनेज, रस्ते सुधारणा, आरोग्य व शिक्षणाशी संबंधित सुविधा, तसेच युवा व महिलांसाठी उपक्रम अशा विविध मुद्द्यांचा समावेश जनहितनाम्यात असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अधिकृत उमेदवार गायत्री मेढे-कोकाटे, बाबुराव चांदेरे, पार्वती निम्हण तसेच अमोल बालवडकर उपस्थित होते. प्रभागातील विकासासाठी करण्यात आलेले निर्णय केवळ कागदावर न राहता प्रत्यक्ष अंमलबजावणी पर्यंत पोहोचवणे, कामांना निश्चित वेळापत्रक देणे आणि नागरिकांच्या तक्रारींवर वेळेत कार्यवाही करणे हीच कार्यपद्धती राहील, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रभाग क्रमांक ९ च्या विकासाला गती देण्यासाठी आवश्यक ते सहकार्य आणि मार्गदर्शन कायम राहील, अशी ग्वाही दिल्याचे उपस्थितांनी सांगितले. कार्यक्रमादरम्यान नागरिकांशी संवाद साधत प्रभागाच्या गरजा, अपेक्षा आणि सूचना जाणून घेण्यात आल्या. विकासकामांचा प्रगती अहवाल आणि जनहितनामा हा प्रभाग क्रमांक ९ साठी पारदर्शक, उत्तरदायी आणि लोकाभिमुख विकासाचा ठोस संकल्प असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.