
आपल्या सुंदर निसर्गाच्या कुशीत अनेक अशी रहस्ये दडलेली आहेत, ज्यांचा उलगडा करणे विज्ञानालाही अजून पूर्णपणे जमलेले नाही. असेच एक थरारक आणि डोक्याला मुंग्या आणणारे रहस्य दडलेले आहे आपल्या भारताच्या ईशान्येकडील आसाम राज्यातील ‘जतिंगा’ या लहानशा गावात.
दरवर्षी मान्सूनचा ऋतू संपताना या गावात निसर्गाचा एक असा विचित्र खेळ पाहायला मिळतो, जो पाहून भलेभले शास्त्रज्ञही चक्रावून गेले आहेत. म्हणूनच या गावाला ‘पक्ष्यांच्या सामूहिक आत्महत्येचे केंद्र’ म्हटले जाते.
काय घडते जतिंगा गावात?
जतिंगा हे आसामच्या दिमा हासाओ जिल्ह्यातील पहाडांनी वेढलेले एक अत्यंत सुंदर आणि शांत गाव आहे. पण सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिने आले की, इथले वातावरण गूढ बनू लागते. या महिन्यांत, विशेषतः अमावास्येच्या रात्री, जेव्हा प्रचंड धुकं असते आणि सोसाट्याचा वारा सुटतो, तेव्हा रात्री ७ ते १० च्या दरम्यान अचानक आकाशातून शेकडो स्थानिक आणि स्थलांतरित पक्षी जमिनीच्या दिशेने झेपावू लागतात.
हे पक्षी वेगाने येऊन झाडांवर, घरांवर किंवा दिव्यांच्या खांबांवर आदळतात आणि जीव देतात. काही पक्षी जमिनीवर पडल्यानंतर पूर्णपणे सुन्न होतात, त्यांना उडण्याची ताकदच राहत नाही. कित्येक दशकांपासून दरवर्षी हाच प्रकार न चुकता घडत आहे.
गावकऱ्यांची अंधश्रद्धा आणि ‘भूतबाधा‘
विज्ञानाचा प्रसार होण्यापूर्वी, जतिंगा गावातील स्थानिक जंतिया आणि डिमासा जमातीचे लोक या घटनेमुळे प्रचंड दहशतीत जगत होते. गावकऱ्यांचा असा विश्वास होता की, आकाशातून उडणारे हे पक्षी नसून स्वर्गातून आलेले भूत किंवा वाईट आत्मे आहेत. रात्रीच्या वेळी अचानक पक्षी अंगावर येऊन पडू लागल्याने लोक घराबाहेर पडायला घाबरत असत. या अमानवी शक्तींपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी गावकऱ्यांनी अनेक पूजा-अर्चा आणि तंत्रमंत्रांचाही वापर करून पाहिला होता. या गावाला लोक शापित समजू लागले होते आणि गावात दहशतीचे वातावरण निर्माण होऊ लागले होते.
शास्त्रज्ञांनी शोधलेले ‘वैज्ञानिक कारण‘
जेव्हा हे रहस्य जगजाहीर झाले, तेव्हा अनेक नामांकित पक्षीतज्ज्ञ आणि शास्त्रज्ञांनी जतिंगा गावात दाखल होऊन संशोधन सुरू केले. त्यांनी या ‘आत्महत्ये’मागचे एक अत्यंत महत्त्वाचे वैज्ञानिक कारण शोधून काढले.
पश्चिम घाटात सापडली ‘Forester’ पतंगाची नवी प्रजाती; प्राणी सर्वेक्षणच्या शास्त्रज्ञांचा मोठा शोध
पक्षी आत्महत्या करत नाहीत, तर ते एका नैसर्गिक सापळ्यात अडकतात- शास्त्रज्ञांच्या मते यामागची प्रमुख कारणे-
दिशाभूल- सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात या डोंगराळ भागात रात्रीच्या वेळी अत्यंत दाट धुके असते आणि वारे वेगाने वाहतात. यामुळे उडणाऱ्या पक्ष्यांना दिशा समजत नाही.
प्रकाशाचे आकर्षण- धुके आणि अंधारामुळे गडद झालेल्या रात्री जेव्हा गावकऱ्यांच्या घरातील दिवे किंवा रस्त्यावरील सर्चलाईट लावलेले असतात, तेव्हा गोंधळलेले पक्षी त्या प्रकाशाकडे आकर्षित होतात.
उंची आणि भूगोलाची रचना- जतिंगा गाव एका विशिष्ट डोंगराळ पठारावर वसलेले आहे, जिथे वाऱ्याचा वेग खूप जास्त असतो. प्रकाशाच्या दिशेने वेगाने येताना वाऱ्याच्या तीव्र झोतामुळे पक्ष्यांचे नियंत्रण सुटते आणि ते झाडांवर किंवा भिंतींवर आदळतात. तसेच, संशोधनात असेही समोर आले की हे पक्षी स्वेच्छेने मरत नाहीत, तर प्रकाशाच्या आकर्षणापोटी खाली आल्यावर जखमी होतात किंवा गावकऱ्यांकडून पूर्वी त्यांची शिकार केली जायची.
आजचे जतिंगा गाव-
काही वर्षांपूर्वीपर्यंत हे गाव एका भीतीदायक कारणासाठी ओळखले जात होते. मात्र, वन्यजीव संस्था आणि सरकारच्या जनजागृतीमुळे आता गावकऱ्यांनी पक्ष्यांना मारणे पूर्णपणे बंद केले आहे. उलट, आता गावकरी या पक्ष्यांचे रक्षण करतात.
आज जतिंगा हे जगातील पर्यटकांसाठी आणि पक्षीप्रेमींसाठी एक मोठे पर्यटन ,कर्षण केंद्र बनले आहे. निसर्गाचे हे अनोखे आणि थोडेसे रहस्यमय रूप जवळून अनुभवण्यासाठी दरवर्षी शेकडो लोक या ‘घोस्ट व्हिलेज’ला भेट देतात.