
World Consumer Rights Day Key facts on Indian consumer rights and awareness
World Consumer Rights Day : दरवर्षी १५ मार्च रोजी जगभरात ‘जागतिक ग्राहक हक्क दिन’ साजरा केला जातो. या दिवसाचे उद्दिष्ट म्हणजे ग्राहकांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देणे आणि ग्राहक संरक्षण कायद्यांविषयी जागरूकता निर्माण करणे. भारतातही ग्राहकांसाठी अनेक अधिकार आहेत, मात्र बऱ्याच वेळा ग्राहकांना त्यांची जाणीव नसते. त्यामुळे ग्राहकांमध्ये जागरूकता निर्माण करणे आवश्यक आहे.
जागतिक ग्राहक दिनाची सुरुवात आणि महत्त्व
जागतिक ग्राहक हक्क दिनाची संकल्पना सर्वप्रथम अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांनी मांडली. १५ मार्च १९६२ रोजी अमेरिकन काँग्रेसला संबोधित करताना त्यांनी ग्राहक हक्कांचा मुद्दा जोरदारपणे मांडला. त्यानंतर १५ मार्च १९८३ पासून हा दिवस अधिकृतपणे साजरा करण्यास सुरुवात झाली. तेव्हापासून, दरवर्षी १५ मार्चला हा दिवस साजरा केला जातो. ग्राहकांच्या हक्कांचे संरक्षण आणि त्यांना न्याय मिळावा, हा यामागील मुख्य उद्देश आहे.
भारतात ग्राहकांना मिळणारे महत्त्वाचे हक्क
भारतीय ग्राहक संरक्षण कायद्यांतर्गत ग्राहकांना अनेक अधिकार देण्यात आले आहेत. त्यातील प्रमुख अधिकार खालीलप्रमाणे आहेत:
१. माहितीचा अधिकार
प्रत्येक ग्राहकाला कोणत्याही उत्पादनाची किंवा सेवेची शुद्धता, किंमत आणि गुणवत्ता याबाबत माहिती विचारण्याचा पूर्ण अधिकार आहे. कोणताही दुकानदार किंवा सेवा प्रदाता ग्राहकाला या माहितीपासून वंचित ठेवू शकत नाही.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘त्यांना सिजफायर नको आहे, पण ते ट्रम्पला घाबरतात…’, पुतीनबद्दल झेलेन्स्कीने केला मोठा दावा
२. निवडीचा अधिकार
ग्राहकाने आपल्या इच्छेनुसार कोणतीही वस्तू किंवा सेवा निवडण्याचा अधिकार आहे. दुकानदार कोणत्याही ग्राहकाला एखादे विशिष्ट उत्पादन घेण्यास भाग पाडू शकत नाही. ग्राहकाला विविध पर्याय उपलब्ध करून दिले पाहिजेत.
३. सुरक्षिततेचा अधिकार
ग्राहकांना सुरक्षित उत्पादने आणि सेवा मिळाव्यात, हा या अधिकाराचा मुख्य उद्देश आहे. जर एखाद्या वस्तूचा दर्जा निकृष्ट असेल आणि त्यामुळे ग्राहकाचे नुकसान होण्याची शक्यता असेल, तर ग्राहक त्या वस्तूविषयी तक्रार दाखल करू शकतो. अशा परिस्थितीत, विक्रेत्याने सदर वस्तू बदलून देणे किंवा त्यासाठी योग्य उपाय करणे आवश्यक आहे.
४. ग्राहक शिक्षणाचा अधिकार
ग्राहकांना त्यांच्या हक्कांविषयी जागरूक करण्यासाठी सरकारने वेळोवेळी उपयुक्त मोहिमा राबवाव्यात. ‘जागो ग्राहक जागो’ ही मोहिम याच उद्देशाने चालवली जाते. ग्राहकांना त्यांच्या हक्कांविषयी संपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे, जेणेकरून त्यांचा अन्याय होणार नाही.
५. ऐकण्याचा अधिकार
जर कोणत्याही ग्राहकासोबत अन्याय झाला असेल किंवा दुकानदाराने गैरवर्तन केले असेल, तर ग्राहकाला त्याविरुद्ध तक्रार दाखल करण्याचा पूर्ण अधिकार आहे. ग्राहक न्यायालयामध्ये आपली बाजू मांडण्याचा आणि न्याय मिळविण्याचा हक्क ग्राहक संरक्षण कायद्यान्वये दिला आहे.
६. निवारण मिळविण्याचा अधिकार
ग्राहकाने केलेल्या तक्रारीवर वेळेवर योग्य तो निर्णय घेतला जावा आणि ग्राहकाच्या समस्येचे निराकरण व्हावे, हा या अधिकाराचा मुख्य हेतू आहे. ग्राहकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केल्यास, ग्राहक निवारण मंचात जाऊन न्याय मिळवू शकतो.
ग्राहकांनी आपल्या हक्कांची जाणीव ठेवणे आवश्यक
भारतात ग्राहक संरक्षण कायदा २०१९ लागू करण्यात आला आहे. या कायद्यांतर्गत ग्राहकांना अधिक संरक्षण देण्याची तरतूद करण्यात आली आहे. तथापि, ग्राहकांनी आपल्या हक्कांची पूर्ण माहिती असणे आवश्यक आहे, जेणेकरून त्यांना कुठलाही अन्याय सहन करावा लागणार नाही. ग्राहकांनी वस्तूंची योग्य माहिती घेऊन खरेदी करावी आणि काही समस्या उद्भवल्यास ग्राहक न्यायालयात तक्रार नोंदवावी.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : रशिया-युक्रेन युद्धविरामावर सौदीची मध्यस्थी; पुतिन आणि क्राऊन प्रिन्समध्ये चर्चा
ग्राहकांना त्यांच्या हक्कांची जाणीव
जागतिक ग्राहक हक्क दिन हा ग्राहकांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देण्याचा एक महत्त्वाचा दिवस आहे. ग्राहकांनी आपल्या अधिकारांची माहिती ठेवावी आणि त्याचा योग्य तो उपयोग करावा. यामुळे ग्राहकांचे हित सुरक्षित राहील आणि बाजारातील प्रामाणिकता आणि गुणवत्ता टिकून राहील. ग्राहक जागरूक असतील, तरच त्यांचा सन्मान आणि संरक्षण शक्य होईल.