World UFO Day What is it and why is it celebrated
World UFO Day 2025 : दरवर्षी 2 जुलै रोजी जागतिक UFO दिन (World UFO Day) साजरा केला जातो. हा दिवस अंतराळ, परग्रहवासीय आणि अज्ञात उडणाऱ्या वस्तूंबाबत (Unidentified Flying Objects – UFOs) लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि चर्चेला चालना देण्यासाठी साजरा केला जातो. 2024 मध्ये हा दिवस मंगळवार दिनांक 2 जुलै रोजी येत आहे. UFO दिनाचा उद्देश केवळ मनोरंजन नसून, वैज्ञानिक दृष्टीकोनातून UFO पाहण्याच्या घटनांचा विचार करणे, मिथकांचा फोलपणा उघड करणे आणि जगभरातील अंतराळप्रेमींना एकत्र आणणे हा आहे.
UFO म्हणजे Unidentified Flying Object, म्हणजेच अशी उडणारी वस्तू जिचे स्वरूप, कार्य किंवा मूळ क्षणभर ओळखता येत नाही. भारतात याला “अज्ञात उडती वस्तू” किंवा सामान्य भाषेत “उडती तबकडी” असेही म्हटले जाते.
सुरुवातीला हा दिवस 24 जून रोजी साजरा केला जात होता, कारण 1947 मध्ये अमेरिकन पायलट केनेथ अर्नोल्ड यांनी त्याच दिवशी वॉशिंग्टन राज्यात काही अज्ञात वस्तू आकाशात उडताना पाहिल्याचा दावा केला होता. त्यानंतर 2001 मध्ये UFO संशोधक हक्तान अकडोगन यांनी याला अधिक औपचारिक रूप दिले. मात्र, नंतर 2 जुलै ही तारीख अधिक मान्यता मिळाली कारण 1947 मध्येच न्यू मेक्सिको राज्यातील रोझवेल येथे एक रहस्यमय घटनेत उडणाऱ्या वस्तूचा अपघात झाल्याचा दावा करण्यात आला होता. ही घटना आजही चर्चेचा आणि संशोधनाचा विषय आहे. त्यामुळे जागतिक UFO दिन संघटनेने 2 जुलै ही अधिकृत तारीख म्हणून घोषित केली.
हे देखील वाचा : सोशल मीडिया डे म्हणजे काय? जाणून घ्या हा दिवस साजरा करण्यामागचे रंजक कारण
या दिवसाचे महत्त्व केवळ UFO मध्ये रस असलेल्या व्यक्तींसाठी नाही, तर ते विज्ञान, खगोलशास्त्र, संरक्षण, संशोधन आणि मानसशास्त्राच्या क्षेत्राशी निगडीत आहे.
1. हा दिवस UFO संदर्भातील मिथक, अपसमज आणि गूढ गोष्टींचा खुला, वैज्ञानिक वादविवादात बदल घडवतो.
2. सरकारी गोपनीयतेबाबत प्रश्न उपस्थित करून अधिक पारदर्शकतेची मागणी करतो.
3. अंतराळातील पृथ्वीबाह्य जीवनाच्या शक्यतेवर चर्चा करण्यासाठी व्यासपीठ प्रदान करतो.
1. दुर्बिणीद्वारे ताऱ्यांचे निरीक्षण – रात्रीच्या आकाशाकडे डोळसपणे पाहताना अनेकांना अज्ञात गोष्टी अनुभवायला मिळतात.
2.UFO परिषदा व चर्चा – जगभरातील अनेक संस्थांनी ऑनलाईन व प्रत्यक्ष चर्चासत्रांचे आयोजन केले जाते.
3. चित्रपट व माहितीपट पाहणे – ‘The Phenomenon’, ‘Close Encounters of the Third Kind’, ‘UFO Hunters’ यांसारख्या माहितीपटांतून अधिक माहिती मिळवता येते.
4. वेबसाइट्स व ब्लॉग वाचणे – UFO विषयी वैध पुरावे, प्रत्यक्षदर्शींचे अनुभव आणि वैज्ञानिक विश्लेषणे अनेक वेबसाइट्सवर उपलब्ध आहेत.
5. सोशल मीडियावर चर्चांमध्ये सहभागी होणे – #WorldUFODay, #UFOsExist यांसारखे ट्रेंड्स वापरून जागरूकता वाढवता येते.
हे देखील वाचा : लघुग्रह दिन का साजरा केला जातो? जाणून घ्या कशी झाली त्याची सुरुवात
जागतिक UFO दिन हा केवळ उडत्या तबकड्यांच्या कुतूहलापुरता मर्यादित नाही. तो विज्ञान आणि कल्पनाशक्ती यांचा संगम दर्शवतो. मानवजातीने आजवर ज्या सीमा पार केल्या आहेत, त्यात आणखी एक पाऊल पुढे टाकण्याचे स्वप्न हा दिवस साकारतो. जगभरात लाखो लोक अजूनही UFO च्या अस्तित्वाबाबत प्रश्न विचारत आहेत – आणि या शोधातच कदाचित आपल्याला भविष्यातील अंतराळ जगाची दारे खुली होतील.