International Asteroid Day : लघुग्रह दिन का साजरा केला जातो? जाणून घ्या कशी झाली त्याची सुरुवात ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
International Asteroid Day 2025 : दरवर्षी ३० जून रोजी जागतिक लघुग्रह दिन (International Asteroid Day) साजरा केला जातो. या दिवसाचे उद्दिष्ट म्हणजे मानवजातीला लघुग्रहांमुळे संभाव्य धोक्यांविषयी जागरूक करणे, तसेच भविष्यात अशा घटनांना रोखण्यासाठी वैज्ञानिक संशोधन आणि जागतिक सहकार्याची गरज अधोरेखित करणे.
लघुग्रह हे सूर्याभोवती फिरणारे लहान खडकाळ पिंड असतात. हे ग्रहांपेक्षा लहान असतात, पण त्यांच्यातील शक्ती मात्र अतिशय घातक ठरू शकते. बहुतेक लघुग्रह मंगळ आणि गुरू ग्रहाच्या मध्ये असलेल्या लघुग्रह पट्ट्यात (Asteroid Belt) फिरत असतात. मात्र, काही लघुग्रह पृथ्वीच्या जवळूनही जातात, जे ‘Near-Earth Objects’ (NEOs) म्हणून ओळखले जातात.
या दिवसाचा उगम तुंगुस्का घटनेच्या स्मरणार्थ झाला. ३० जून १९०८ रोजी सायबेरियातील तुंगुस्का नदी परिसरात एक महाकाय स्फोट झाला. अनेक शास्त्रज्ञांच्या मते, हा स्फोट एका लघुग्रहामुळे झाला होता. त्याने सुमारे २,१५० चौरस किमी क्षेत्रातील वनस्पती नष्ट केल्या. हा स्फोट हिरोशिमा अणुबॉम्बच्या १०० पट जास्त शक्तिशाली होता, अशी नोंद आहे. या घटनेच्या स्मरणार्थ आणि भविष्यात अशा धोक्यांपासून पृथ्वीचे संरक्षण करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने (UNGA) डिसेंबर २०१६ मध्ये ३० जून हा ‘आंतरराष्ट्रीय लघुग्रह दिन’ म्हणून जाहीर केला.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : संयुक्त राष्ट्रात भारताची आक्रमक तयारी; पाकिस्तानचा डाव उधळण्याची रणनीती तयार
जगभरात अनेक देशांमध्ये शालेय स्पर्धा, विज्ञान प्रबोधन कार्यक्रम, डॉक्युमेंटरी फिल्म्स, चर्चासत्रे, आणि खगोलशास्त्रावर आधारित कार्यशाळा घेण्यात येतात. या उपक्रमांमधून नागरिकांना लघुग्रह म्हणजे काय, त्यांचे धोके, आणि त्यावर उपाययोजना यांची माहिती दिली जाते. लघुग्रह दिनाचा अजून एक उद्देश म्हणजे भविष्यात या लघुग्रहांमधील खनिज संपत्तीचा वापर कसा करता येईल, यावर संशोधनास चालना देणे. अनेक शास्त्रज्ञांचा विश्वास आहे की, लघुग्रहांमध्ये मौल्यवान धातू, पाणी आणि इंधनाचे स्रोत सापडू शकतात.
आजपर्यंत अनेक लघुग्रह पृथ्वीच्या अगदी जवळून गेले आहेत. काही तर केवळ दहा हजार किलोमीटर अंतरावरून गेले, जे भूपृष्ठावर प्रभाव टाकू शकणाऱ्या अंतरापेक्षा खूपच कमी आहे. त्यामुळे शास्त्रज्ञ आणि जागतिक संस्था NASA, ESA (युरोपियन स्पेस एजन्सी), आणि ISRO या संस्थांमार्फत सतत निरीक्षण करत असतात. 2022 मध्ये NASA ने DART (Double Asteroid Redirection Test) नावाचा प्रयोग करून एका लघुग्रहाच्या मार्गात बदल करण्याची यशस्वी चाचणी केली होती, ज्यामुळे भविष्यातील धोक्यांपासून पृथ्वीचे संरक्षण शक्य होणार आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : फक्त एक महिना बाकी… मग इराण करणार ‘ते’ काम, ज्याची अमेरिका आणि इस्रायलसह संपूर्ण जगाला भीती!
जगभरात साजरा होणारा आंतरराष्ट्रीय लघुग्रह दिन म्हणजे केवळ विज्ञानप्रेमींसाठीचा उत्सव नसून, तो मानवजातीच्या भवितव्याच्या सुरक्षेसाठी दिला जाणारा इशारा आहे. या दिवसाच्या निमित्ताने आपण अंतराळातील अशा अदृश्य धोक्यांविषयी सजग व्हायला हवे आणि वैज्ञानिक संशोधनास अधिक प्रोत्साहन द्यायला हवे.
‘अंतराळाकडे केवळ विस्मयाने पाहण्याऐवजी, त्याच्याशी जपून वागण्याची ही वेळ आहे!’