सोशल मीडिया डे 2025 : संवाद, सर्जनशीलता आणि बदल घडवणाऱ्या डिजिटल शक्तीचा उत्सव ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Social Media Day 2025 : आज जगभरात ‘सोशल मीडिया डे’ उत्साहात साजरा केला जात आहे. दरवर्षी ३० जून रोजी साजरा होणारा हा दिवस आता केवळ डिजिटल उत्सव न राहता, सामाजिक बदल, संवाद आणि सर्जनशीलतेचे प्रतीक बनला आहे. सोशल मीडियाच्या प्रभावशाली प्रवासाला गौरविणारा हा दिवस, आजच्या युगात प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनलेल्या या माध्यमाच्या सामर्थ्याची आठवण करून देतो.
२०१० मध्ये प्रसिद्ध टेक वेबसाइट मॅशेबलने सोशल मीडिया डे साजरा करण्याची सुरुवात केली. जून महिन्यात अनेक मोठ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या यशस्वी कामगिरीनंतर ३० जूनचा दिवस निवडण्यात आला. या उपक्रमाला जगभरातील कंटेंट क्रिएटर्स, डिजिटल मार्केटर्स, युजर्स आणि ब्रँड्सनी मोठा प्रतिसाद दिला, आणि अल्पावधीतच हा दिवस जागतिक स्वरूपाचा उत्सव ठरला.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘ग्रोसी’च ठरला इराणवर झालेल्या हल्ल्याचे कारण? डेली इराण मिलिटरीने केला अत्यंत ‘गंभीर’ आरोप
सोशल मीडियाचा हेतू केवळ संवाद साधणे हा नसून, तो व्यवसायवृद्धी, सामाजिक जागृती, वैयक्तिक ब्रँडिंग आणि वैचारिक देवाणघेवाणीचे प्रभावी साधन बनले आहे. हे व्यासपीठ सर्जनशील विचारांना आंतरराष्ट्रीय व्यासपीठ मिळवून देते, तर सामान्य व्यक्तीलाही आपला आवाज जगापर्यंत पोहोचवण्याची संधी देते. या दिवसाचे उद्दिष्ट म्हणजे सोशल मीडियाच्या सकारात्मक वापराला प्रोत्साहन देणे, सर्जनशीलतेला चालना देणे, आणि समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी याचा उपयोग कसा करता येईल हे दाखवणे. त्यामुळे अनेक कंपन्या, शैक्षणिक संस्था आणि डिजिटल मोहिमा #SocialMediaDay सारख्या हॅशटॅगद्वारे विविध उपक्रम आयोजित करतात.
आजच्या घडीला फेसबुक आणि लिंक्डइन वैयक्तिक व व्यावसायिक नात्यांवर केंद्रित आहेत, तर एक्स (पूर्वीचे ट्विटर) आणि थ्रेड्स माहिती लवकर पोहोचवण्यावर भर देतात. इंस्टाग्राम, यूट्यूब आणि स्नॅपचॅट फोटो, व्हिडिओ आणि लाईव्ह स्ट्रीमसाठी वापरले जातात. हे सर्व प्लॅटफॉर्म युजर्सच्या विविध गरजा आणि सर्जनशीलता यांना वाव देतात.
‘सोशल मीडिया डे’ निमित्त इंटरनॅशनल जर्नल ऑफ होम सायन्स या नियतकालिकात प्रकाशित झालेल्या अहवालात नमूद करण्यात आले आहे की, भारतामध्ये तरुणांमध्ये सोशल मीडियाचा वापर प्रचंड वाढला आहे. तरुण पिढीने सोशल नेटवर्किंगला केवळ एक ट्रेंड म्हणून नव्हे, तर व्यक्तिमत्त्वाच्या अभिव्यक्तीचे, सामाजिक संपर्काचे आणि करिअर उभारणीचे माध्यम म्हणून स्वीकारले आहे. अहवालात असेही स्पष्ट करण्यात आले की, सोशल मीडियाचा तरुणांवर सकारात्मक तसेच नकारात्मक परिणाम होतो. जसे की सर्जनशीलता, नव्या कल्पना आणि संवादकौशल्य वृद्धिंगत होते, तसेच आत्मकेंद्रीपणा, व्यसनाधीनता, सामाजिक तणाव हे नकारात्मक परिणामही दिसून येतात.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : संयुक्त राष्ट्रात भारताची आक्रमक तयारी; पाकिस्तानचा डाव उधळण्याची रणनीती तयार
आजचा ‘सोशल मीडिया डे’ हे डिजिटल जगातील नव्या पर्वाचे प्रतीक आहे. योग्य पद्धतीने वापरल्यास सोशल मीडिया हे शिक्षण, रोजगार, संवाद, परिवर्तन आणि सर्जनशीलतेचा महत्त्वाचा पूल ठरू शकतो. म्हणूनच हा दिवस केवळ सेलिब्रेशन न राहता, जबाबदारीने वापरण्याचा संकल्प करण्याचा दिवस मानला जातो. आजच्या दिवशी, आपण सर्वांनी सोशल मीडियाच्या उपयोगाला नवा अर्थ देत, त्याचा उपयोग समाजहितासाठी, वैचारिक प्रगल्भतेसाठी आणि सकारात्मक बदलासाठी कसा करता येईल, याचा विचार करणे महत्त्वाचे आहे.