'जिद्द ना सोडली', योगिता मानेने बस चालवत रचला इतिहास; महिला असूनही पेलली जबाबदारी
Yogita Mane First Female Bus Driver : ‘जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाला उध्दारी,’ असे म्हटले जाते. संत तुकडोजी महाराज यांचे हे विधान सार्थ ठरवित महिला वेगवेगळ्या क्षेत्रात आपला ठसा उमटवित आहेत.आज प्रत्येक क्षेत्रात महिला या पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करताना पाहायला मिळत आहे. अशीच एक नवदुर्गा जिने पहिली महिला चालक म्हणून बसचे स्टेअरिंग हाती घेतले . नवी मुंबईतील योगिता माने असं या महिलेचे नाव आहे. तिने पहिली महिला तेजस्विनी बसचालक होण्याचा मान मिळवला आहे. तिचा आतापर्यंतचा हा प्रवास नेमका कसा झाला, याचविषयावर नवराष्ट्र नवदुर्गाच्या माध्यमातून खास मुलाखत…
आजपर्यंत कधी डांबरी, कधी काँक्रिटच्या तर कधी, ग्रामीण भागातील ओबडधोबड रस्त्यांवरुन धावणाऱ्या परिवहन महामंडळाच्या बससेवेतही आता महिला दिसू लागल्या आहेत. याआधी बसची बेलदोरी हाती धरुन बसमध्ये वाहकाची कामगिरी सक्षमपणे पार पाडणाऱ्या महिलांच्या हाती आता बसचे स्टेअरिंगही आले आहे. एक महिला बस चालवित असल्याचे दुर्मिळ दृश्य नवी मुंबईत योगिता माने यांच्या रुपाने दिसू लागले आहे.
लहानपणापासूनच दुचाकी असो किंवा चारचाकीबाबत आकर्षण होते. आजोबांकडून ५० पैसे खाऊसाठी मिळायचे, पण ते पैसे घेऊन अर्धातास सायकल चालवायची. खाऊ न खाता सायकल चालवली. तसेच काकाचं देखील गॅरेज असल्यामुळे तिथे दुचाकी चालवायला शिकली. माहेरी असताना नोकरी करण्याची कधी वेळ आली नाही. लग्नानंतर मात्र नवी मुंबईतील वाशी या परिसरात घर घेतले अन् पुढच्या दोन महिन्यांत पतीची नोकरी गेली. घरातील कर्त्या माणसाची नोकरी गेल्यानंतर सर्व आर्थिक गणित ढासळलं. आता काय करावे हा मोठा प्रश्न समोर होता. कुटुंबाचा खर्च, मुलांचे शिक्षण या गुंतागुंतीमध्ये एक दिवस वर्तमान पेपरमध्ये महिला चालक म्हणून जाहिरात निघाली होती. त्यावेळी कोणत्याही क्षणाचा विलंब न करता मुलाखतीसाठी नवी मुंबईतील परिवहन विभागाला भेट दिली. परिवहन विभागात गेल्यानंतर समजलं की, या मुलाखतीत निवड झाली तर तेजस्विनी बस चालकची पहिला महिला बसचालकाचा मान मिळणार. हे ऐकताच आणखीन उत्सुकता वाढली. भरतीचा अर्ज करून ती परीक्षा चांगल्या मार्काने पासदेखील झाले.
त्यानंतर परिवहन महामंडळाने एक वर्षाच ट्रेनिंग दिले होते. त्यामुळे एक आत्मविश्वास आला. प्रशिक्षणानंतर ८ मार्च २०१८ साली म्हणजे महिला दिनाच्या दिवशी बसचं स्टेअरिंग हाती घेतलं. महिला चालक म्हणून सगळे कौतुकाने बघत होते. त्यामुळे तो प्रवास खरंच अविस्मरणीय असा होता, या शब्दात योगिता माने यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. महाराष्ट्र शासनाची महिलांसाठी तेजस्वीनी या बससाठी विशेष भरती करण्यात आली. तेजस्वीनी बस ही केवळ महिला चालक, वाहक आणि महिला प्रवाशांसाठी होती.
गेली ७ वर्ष नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये महिला बस चालक म्हणून कार्यरत आहे. दिवसभरात नवी मुंबईत बसच्या आठ फेऱ्या असतात, यामध्ये चार फेऱ्या जवळच्या अंतरावर असतात तर चार फेऱ्या लांबच्या अंतरावर असतात. गेल्या सात वर्षात एकदाही गाडीचा अपघात झाला नाही. विनाअपघात नवी मुंबईची बस चालवत आहे. यासाठी दिल्लीत पहिल्या महिला आयपीएस किरण बेदी यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला.
बसच्या स्टेअरिंगवर बसलेल्या चालकाला अनेक प्रकारच्या ताणतणावाचा अनुभव येत असतो. जसे की, प्रवाशांची सुरक्षितता, वेळेचं नियोजन, वाहनाची देखभाल, रस्त्यावरील धोके, वाहतूक नियंत्रण आणि वैयक्तिक शारीरिक व मानसिक ताण यासारख्या गोष्टींचा समावेश असतो. पण बसच्या स्ट्रेअरिंग वर बसल्यानंतर तणावमुक्त राहून गाडी चालवते. कारण १०० ते १५० प्रवाशांचा विश्वास हीच माझ्यासाठी मोठी ताकत आहे. प्रवाशांना त्यांच्या गंतस्थानी सुखरुप सोडणं हीच माझी जबाबदारी आहे,अशी माहिती योगिता यांनी नवराष्ट्रला दिली.
केवळ चूल आणि मुल या चौकटीत अडकून न राहता आता महिलांनी ही चौकट मोडून सर्वच क्षेत्रात आघाडी घेत आपली स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. आजची स्त्री चूल आणि मूल ह्याचा खूप पुढे आली आहे. आता ती चूल मूल आणि तिचं अस्तित्व उभं करण्याला ही महत्त्व देते. ती अजून कणखर बनत चालली आहे आणि अर्थात तिनी बनायलाच हवं, असं मतं योगिता माने यांनी व्यक्त केलं.
गेल्या 7 वर्षापासून विनाअपघात बस चालवतं आहे. पण अद्याप सेवेत पर्मनंट झाली नाही. सुरुवातीला पहिली महिला बस चालक असल्याचे आश्वासन देऊन बसचं स्टेअरिंह हातात घेतलं. मात्र आता तरी सरकारने दखल घ्यावी, अशी नवराष्ट्रच्या माध्यमातून विनंती करते.