“स्त्री जन्म ही तुझी कहाणी हृदयी अमृत नयनी पाणी” अशी काहीशी ओळख स्त्री जातीची या समाजात आहे. घर सांभाळणारी कुटुंबाला जोडणारी हे गुण तिच्यात उपजत आहेतच पण घराबरोबर ती तिच्या करियरसाठी देखील पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करते. खरंतर ही जिजाऊ आणि सावित्रीमाईं आणि अशा अनेक रणरागिणींनी भविष्यातील अनेक स्त्रियांना जगण्याचे धडे दिले आहेत. याच रणरागिणींचा वारसा काही धाडसी स्त्रियांनी पुढे नेत आहे. जे हात बांगड्या भरुन घर सावरतात तेच हात धिटाईने सामाजात अशी काही कामगिरी बजावतात की जग त्यांना दुर्गेची उपमा देतो.
नवराष्ट्र नवदुर्गा या विशेष कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ती प्रियांका कांबळे यांच्याशी संवाद साधला आहे. असं म्हणतात की, एखाद्या कठीण परिस्थितीतून आपण जात नाही तोवर समोरच्या व्यक्तीचे होणारे हाल किंवा यातनांची झळ आपल्याला पोहोचत नाही. प्रियांका कांबळे या हेल्पिंग हँड या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून महिलांसाठी आणि वयात येणाऱ्या मुलींसाठी काम करतात. आजवर देश परदेशात त्यांना सामाजिक क्षेत्रातील विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. त्यांच्या कामाची फेमिना या आंतरराष्ट्रीय मासिकाने देखील दखल घेतली. आदिवासी पाड्यात मासिकपाळीबाबत जनजागृती करणं, लैंगिकशोषणाबाबत माहिती देणं यासगळ्यावर संवेदनशील विषयांवर त्या मोलाचं काम करतात.
प्रियांका म्हणतात की, आपल्या देशातील लोकांनी द्विधा मानसिकता आहे. जे एकीकडे दुर्गेची पूजा करतात आणि दुसरीकडे घरातल्याच स्त्रीला हिन दर्जाची वागणूक देतात तिचा छळ करतात एवढं कमी की काय तर घरचाच कर्ता पुरुष कुटुंबातील किंवा परस्त्रीवर बलात्कार करतो. याचं कारण म्हणजे पुर्वापार चालत आलेली मानसिकता. ती अशी की, स्त्री ही अबला आहे, तिन नाजूक, शोषिक, चूल आणि मूल एवढंच सांभाळाव अशी अशा रुढी परंपरा पुर्वापार समाजाकडून लादण्यात आलेल्या आहेत, याचाच गैरफायदा घेत स्त्री म्हणजे उपभोगण्याचं साधन असा गैरसमज रुढ होत गेलेला आहे.
जी पाळी स्त्रीच्या असण्याची खूण आहे तिलाच विटाळ समजलं जातं. अगदी आता सुद्धा नवरात्र सुरु झालीये या दिवसात देवीच्या मुर्तीची पूजा करतील पण तेच कोणत्या मुलीला किंवा महिलेला पाळी आली तर तिला या सगळ्यापासून लांब ठेवतीस हे फक्त गावाखेड्यात चालतं का ? तर नाही हे सगळे समजगैरसमज शहरात देखील आहेत.पाळीला विटाळ म्हणणाऱ्यांमध्ये शहरातील नागरिकांचं देखील प्रमाण तितकंच आहे.
शहरातील परिस्थितच एवढी भयाण आहे तर गावच्या ठिकाणी कोणत्या आव्हानांना सामोरं जावं लागतं, याबाबत सांगताना प्रियांका म्हणाल्या की, मासिकपाळीविषयी गावाखेड्यात एक टॅबू लागलेला आहे. खरंतर पाळीबाबात आदिवासी पाड्यातील महिलांशी संवाद सााधताना त्यांना विश्वास द्यावा लागतो. खरंतर या सगळ्यात अनेकदा अडथळे आलेत ते सत्ताधाऱ्यांकडून. गावातील महिला आणि मुलींना पाळीबाबत आणि लैंगिक शिक्षण मिळालं तर याचा आपल्या मतांवर परिणाम होईल, या कारणासाठी अनेकदा गावातील सत्ताधाऱ्यांकडून विरोध केला जातो. अशा आव्हानांना अनेकदा सामोरं जावं लागतं.
सध्या अनेकदा बातम्यांमध्ये ऐकायला वाचायला येतं की, अल्पवयीन मुलीने बाळाला जन्म दिला किंवा शाळकरी मुलीवर बलात्कार झाल्याने ती गर्भवती राहिली, शाळकरी मुली या आधीही लैंगिक अत्याचाराला बळी पडल्या आहेत आणि आजही पडत आहेत. फरक फक्त इतकाच आहे की याबाबातचे रिपोर्ट आता होत आहेत. सोशल मीडियामुळे खूप कमी वेेळात घटना वाऱ्याच्या वेगाने पुढे येताना दिसत आहेत. बलात्काराचं प्रमाण आज जास्त वाढलंय असं नाही तर या घटना आता समोर यायला लागले आहेत गुन्ह्यांची नोंद आता व्हायला लागली आहे, म्हणून ते दिसून येतं. याच्या आधी असे गुन्हे होत नव्हते का ? तर होते फक्त न्याय मिळत नव्हता आणि गुन्हा सिद्ध होत नव्हता, गुन्ह्याची नोंद होत नव्हती.
या सगळ्यात पालकांची भूमिका काय ? तर प्रत्येक वेळी मुलींना सांगितलं जातं की, नीट वाग, सरळ बस, ओढणी घे, अंगभर कपडे घाल, संध्याकाळ व्हायच्या आत परत ये, मुलांशी फार बोलू नकोस हे सगळं मुलींना सांगितलं जातं. मात्र खरी गरज आहे ते मुलांना पालकांनी लहानपणापासून शिकवण देण्याची. ती म्हणजे मुलींना त्रास देऊ नये, मुलींच्या मनाविरुद्ध तिला हात लावून नये, तिच्याकडे पाहताना तुझी नजर आदराची असावी हे मुलांना पालकांनी सांगायला हवं आहे. मुली सक्षम आहे स्वत:चं संरक्षण करायला पण मुलांना शिकवायला हवं की, तिच्या शरीराकडे वाईट नरजेने पाहू नये. आज शााळेतूनच आणि घरातूनच हे संस्कार मुलांना देणं गरजेचं आहे. मुलांना मासिकपाळी किंवा मुलींच्या शरीरात होणारे बदल याबाबत योग्यरित्या विश्वासात घेत कधीच सांगितलं जातं नाही. हे कुतूहल वाढत जातं आणि त्याचा वाईट परिणाम दिसून येतो. त्यामुळे पालकांनी विश्वासात घेत वयात येणाऱ्या मुलांशी योग्यरित्या संवाद साधणं गरजेचं आहे.
लैंगिक शोषण हे फक्त मुलींचच होतं का तर नाही? अनेक अल्पवयीन मुलींप्रमाणे मुलांवर देखील लैंगिक अत्याचार होत आहेत. याचमुळे शाळेत जाणाऱ्या मुलामुलींना गुड टच बॅड टच काय असतो हे शाळेतील शिक्षक आणि पालकांनी समजावून सांगणं गरजेचं आहे. आपल्या गुप्तअंगाला आपल्या परवानगीशिवाय कोणीही स्पर्श करु शकत नाही, हे त्यांना समजून सांगण गरजेचं आहे. असं काही घडलंच तर आई वडिलांना याबाबत घाबरुन न जाता लगेच सांगायला हवं हे मुलांना विश्वासात घेऊन सांगणं पालकांच कर्तव्य आहे. त्यासाठी पालकांचं मुलांशी नातं विश्वासाच असणं महत्वाचं आहे, असं सामाजिक कार्यकर्त्या प्रियांका यांनी बलात्कार लैंगिक शोषणाबाबत पालकांनी काय भूमिका घ्यावी याबाबत सांगितलं आहे.