
Representative image
अरुणाचल क्रिकेट असोसिएशन (ACA) सध्या एका कायदेशीर वादात अडकली आहे. अरुणाचल क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकांसंदर्भात सध्या दोन गटांमध्ये तीव्र वाद सुरू आहे. अनेक जिल्हा क्रिकेट संघटनांनी निवडणुकीत हेराफेरी आणि अनियमितता झाल्याचा आरोप केला आहे, त्यानंतर हे संपूर्ण प्रकरण आता गुवाहाटी उच्च न्यायालयाच्या इटानगर खंडपीठासमोर पोहोचले आहे. यामुळे अरुणाचल प्रदेशला २०२६-२७ रणजी ट्रॉफीसाठी आपला संघ जाहीर करता आलेला नाही.
वरिष्ठ संघातील खेळाडू तेची नेरी यांनी पुष्टी केली की, खेळाडूंसाठी कोणतीही निवड प्रक्रिया, तयारी किंवा सराव शिबिर नसल्यामुळे ते सध्या इटानगरमध्ये अडकले आहेत. या प्रशासकीय संकटामुळे ज्युनियर क्रिकेटवरही गंभीर परिणाम झाला असून, राज्याचा १९ वर्षांखालील संघ विनू मांकड ट्रॉफीमध्ये सहभागी होऊ शकलेला नाही.
बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी यापूर्वी स्पष्ट केले होते की, एसीए (ACA) मधील दोन गटांमधील सध्याच्या तणावामुळे क्रिकेटविषयक निर्णय आणि संघ निवडीत अडथळा येत आहे. अरुणाचल प्रदेशातील सहा जिल्ह्यांच्या क्रिकेट संघटनांनी एसीएच्या अधिकृत निवडणुकीत नियमांचे उल्लंघन झाल्याचा आरोप केला असून, फेरनिवडणुकीची मागणी केली आहे.
अरुणाचल प्रदेशने खेळण्यास नकार दिल्यानंतर, नागालँडला विजेता घोषित करून सहा गुण देण्यात आले. पुढील आठवड्यात अरुणाचलचा सामना सिक्कीमविरुद्ध आहे. जर कायदेशीर प्रक्रिया पुढे सरकली नाही आणि कोणताही निकाल लागला नाही, तर हा सामनादेखील रद्द होऊ शकतो. गेल्या १७ वर्षांत रणजी ट्रॉफीचा सामना रद्द होण्याची ही पहिलीच वेळ आहे. याआधी, २००९ मध्ये, सर्व्हिसेस संघाने सुरक्षेच्या कारणास्तव श्रीनगरला जाण्यास नकार दिला होता. यामुळे जम्मू आणि काश्मीरवा वॉकओव्हरने विजयी घोषित करण्यात आले.