
Ashes series 2025: Pat Cummins broke Mitchell Johnson's record in Test cricket.
Pat Cummins broke Mitchell Johnson’s record : ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांच्या अॅशेस कसोटी मालिकेतील तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने मोठा कारनामा केला आहे. दुखापतीमुळे पॅट कमिन्स पहिल्या आणि दुसऱ्या सामन्यांना मुकला होता. मात्र तिसऱ्या सामन्यात मात्र त्याने आतापर्यंत दोन्ही डाव मिळून ६ बळी घेत मिचेल जॉन्सनचा विक्रम मोडला आहे.
कमिन्सने ऑली पोपची विकेट घेताच जॉन्सनला पिछाडीवर सोडले आहे. जॉन्सनने त्याच्या कसोटी कारकिर्दीत ७२ सामन्यांमध्ये ३१३ बळी टिपले आहेत. कर्णधार पॅट कमिन्सने फक्त ७२ सामन्यांमध्ये मिचेल जॉन्सनला मागे टाकले आहे. आता त्याच्याकडे कसोटी क्रिकेटमध्ये ३१५ बळी जमा आहेत. यासह, पॅट कमिन्स कसोटी क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाच्या सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत सहाव्या स्थानावर जाऊन पोहोचला आहे.
ऑस्ट्रेलियासाठी सर्वाधिक बळी घेण्याचा विक्रम शेन वॉर्नच्या नावावर जमा आहे. त्याने १४५ सामन्यात ७०८ बळी टिपले आहेत. या कसोटीत नॅथन लायन दुसऱ्या स्थानी विराजमान आहे. त्याने ग्लेन मॅकग्राचा विक्रम मोडून आतापर्यंत १४१ सामन्यात ५६४ बळी टिपण्याची किमया साधली आहे. ग्लेन मॅकग्राच्या खात्यावर ५६३ बळी जमा आहेत.
अॅडलेड ओव्हल येथे खेळवण्यात येत असलेल्या तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत अॅलेक्स कॅरीच्या शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ३७१ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात, इंग्लंडने पहिल्या डावात २८६ धावाच करू शकला. इंग्लंडकडून कर्णधार बेन स्टोक्सने ८३ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ८५ धावांची आघाडी घेतली. तर दुसऱ्या डावात ट्रॅव्हिस हेडच्या शतकामुळे ऑस्ट्रेलियाने ३४९ धावा केल्या आणि इंग्लंडला कसोटी जिंकण्यासाठी ४३५ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.