IND vs BAN: Mustafizur Rahman is marking 'this' record! History is made in the match against India
Asia cup 2025 : आशिया कप २०२५(Asia cup 2025) मधील सुपर ४ चा चौथा सामना आज भारत आणि बांगलादेश यांच्यात रंगणार आहे. आजचा हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. आशिया कपच्या अंतिम फेरीच्या शर्यतीत असलेल्या दोन्ही संघांसाठी हा सामना महत्त्वाचा असणार आहे. या सामन्यात भारताचा संघ विजयाचा मुख्य दावेदार मानला जात आहे. परंतु या सामन्यादरम्यान बांगलादेशचा गोलंदाज मुस्तफिजुर रहमानला इतिहास रचण्याची संधी आहे.
बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमान जर भारतीय संघाविरुद्ध एकही विकेट घेण्यास यश मिळवले तर तो टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १५० विकेट घेणारा पहिला बांगलादेशी असणार आहे. बांगलादेशच्या मुस्तफिजुर रहमानने २०१५ पासून ११७ टी-२० सामने खेळले आहेत. या सामन्यांमध्ये २०.५७ च्या सरासरीने १४९ विकेट चटकावल्या आहेत. या कालावधीत रहमानने एका डावात तीन वेळा चार किंवा त्याहून अधिक विकेट घेण्याची किमया साधली आहे. २५ मे २०२४ रोजी, युएई विरुद्ध, या वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमानने चार षटकांत फक्त १० धावा देऊन सहा बळी घेण्याचा विक्रम केला होता.
सध्या, मुस्तफिजुर रहमान बांगलादेशसाठी सर्वाधिक टी-२० बळींचा विक्रम शकिब अल हसन यांच्याशी बरोबरी केली आहे. शकिबने १२९ टी-२० सामन्यांमध्ये १४९ बळी टिपले आहेत. जागतिक स्तरावर, फक्त तीन गोलंदाजांनी १५० टी-२० बळी मिळवण्यात यश मिळवले आहे. यामध्ये रशीद खान अव्वल स्थानी (१७३ बळी), टिम साउदी (१६४ बळी) आणि ईश सोधी (१५०) यांचा समावेश होतो.
डावखुरा वेगवान गोलंदाज असणाऱ्या मुस्तफिजुर रहमानने २०२५ च्या आशिया कपच्या चार सामन्यांमध्ये १५ षटके टाकली असून यामध्ये त्याने ९० धावा मोजून ७ विकेट्स घेतल्या आहेत. सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत मुस्तफिजुर रहमान हा चौथ्या क्रमांकावर आहे. मुस्तफिजूर रहमानने २०२५ च्या आशिया कपमध्ये हाँगकाँगविरुद्ध २२ धावा देऊन त्याला एकही बळी घेता आला नाही. त्यानंतर त्याने श्रीलंकेविरुद्ध ३५ धावा देऊन १ बळी मिळवला.
मुस्तफिजुर रहमानने अफगाणिस्तानविरुद्ध २८ धावा मोजून ३ बळी टिपले होते, तर श्रीलंकेविरुद्धच्या सुपर-४ सामन्यात त्याने फक्त २० धावांत ३ बळी घेतले. या सुपर ४ सामन्यात भारतीय संघ बाजी मारून अंतिम फेरीत प्रवेश करण्याचे ध्येय ठेवणार आहे. दरम्यान, बांगलादेश संघ देखील सुपर-४ मध्ये सलग दुसऱ्या विजयाचे लक्ष्य ठेवणार आहे.