हार्दिक पंड्या(फोटो-सोशल मीडिया)
Asia cup 2025 : आशिया कप २०२५ मध्ये आतापर्यंत ३ सुपर ४ सामने खेळून झाले आहेत. आज भारत आणि बांगलादेश यांच्यातील चौथा सुपर ४ सामना आज, २४ सप्टेंबर रोजी खेळवला जाणार आहे. दोन्ही आशियाई संघ या स्पर्धेत आपला पहिला सुपर ४ सामना जिंकून आले आहेत. भारत आणि बांगलादेश यांच्यातील सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे. अंतिम फेरीच्या दिशेने पाऊल भक्कम करण्यासाठी अतिशय महत्वाचा असणार आहे. दरम्यान, भारतीय संघातील अष्टपैलू हार्दिक पंड्याकडे विक्रम प्रस्थापित करण्याची सुवर्णसंधी चालून आली आहे.
या सामन्यात हार्दिक पंड्या टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बळींचे शतक पूर्ण करण्याच्या खुप जवळ आला आहे. २१ सप्टेंबर रोजी पाकिस्तानविरुद्धच्या सुपर-४ सामन्यामध्ये हार्दिक पंड्याने फखर जमानला बाद करत सर्वाधिक टी२० विकेट घेणारा भारतीय म्हणून युजवेंद्र चहलला मागे टाकले होते.
हेही वाचा : ICC ने USA क्रिकेट सदस्यत्व केले निलंबित, काय आहे कारण; मात्र मोठ्या टूर्नामेंटमध्ये खेळणार अमेरिकेची टीम
हार्दिक पंड्याने आतापर्यंत ११८ टी२० सामने खेळले आहेत. या सामन्यांमध्ये ९७ विकेट काढल्या आहेत. तर चहलने ८० सामन्यांमध्ये ९६ विकेट मिळवल्या आहेत. आजच्या सामन्यात जर पंड्याने ३ विकेट घेतल्या तर तो टी२० क्रिकेटमध्ये बळींचे शतक पूर्ण करेल.
भारतीय संघातील गोलंदाज अर्शदीप सिंग हा टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० गडी बाद करणारा एकमेव भारतीय गोलंदाज आहे. त्याने ६४ टी२० सामन्यांमध्ये १८.४९ च्या सरासरीने १०० बळी टिपले आहेत. जागतिक स्तरावर, अफगाणिस्तानचा रशीद खान १७३ विकेटसह सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलदाजांच्या यादीमध्ये पहिल्या स्थानावर आहे.
भारत आणि बांगलादेश या संघातील सुपर-४ सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. आशिया कप २०२५ मध्ये आतापर्यंत भारतीय संघाने सलग चार सामने जिंकून आपला दबदबा राखला आहे. भारतीय संघाने यूएईविरुद्धचा पहिला सामना ९ विकेटने आपल्या खिशात टाकला. त्यानंतर, भारताने पाकिस्तानविरुद्ध ७ विकेटने धामकेदार विजय मिळवला. तसेच भारतीय संघाने ओमानविरुद्धचा सामना २१ धावांनी जिंकला. त्यानंतर, भारताने पहिल्या सुपर-४ सामन्यात पाकिस्तानचा ६ विकेटने पराभव केला.
बांगलादेशने हाँगकाँगविरुद्ध ७ विकेट्सने विजय मिळवल्यानंतर, त्यांना श्रीलंकेविरुद्ध ६ विकेट्सने पराभव पत्करावा लागला होता. तथापि, बांगलादेशने धामकेदार पुनरागमन केले आणि अफगाणिस्तान आणि श्रीलंकेविरुद्धचे त्यांचे पुढील दोन्ही सामने जिंकले.
हेही वाचा : IND vs BAN: सुपर – 4 मध्ये भारताविरूद्ध बांगलादेशचा निभाव लागणार? कसा आहे रेकॉर्ड