
Asian Para Games : सुमित अंतिलचा भालाफेकीत 'गोल्डन' थ्रो! भारताची पदकांची विक्रमी शंभरी पार
एशियन पॅरा गेम्स 2026 (Asian Para Games) मध्ये भारतीय खेळाडूंची पदकांची घोडदौड सुरूच आहे. विश्वविजेता आणि पॅरालिम्पिक चॅम्पियन सुमित अंतिलने पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकत आपल्या विजेतेपदाचा यशस्वी बचाव केला. या स्पर्धेत भारताने तिन्ही पदके जिंकत वर्चस्व गाजवले.
दरम्यान, भारताच्या एकूण पदकांची संख्या 114 वर पोहोचली असून, एशियन पॅरा गेम्समधील भारताची ही आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे.
नागोया येथील मिजुहो पार्क अॅथलेटिक्स स्टेडियमवर झालेल्या पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेत सुमित अंतिलने 72.46 मीटर अंतरावर भाला फेकत सुवर्णपदक पटकावले. महेंद्र गुर्जरने 59.03मीटरच्या कामगिरीसह रौप्यपदक मिळवले, तर संदीप सरगरने 64.48 मीटर अंतर गाठत कांस्यपदक जिंकले. या दोघांनीही आपापल्या गटांत स्पर्धेचा विक्रम नोंदवला.
भारताच्या प्रणव सूरमाने पुरुषांच्या क्लब थ्रो एफ-51 प्रकारात 32.87 मीटर अंतरावर क्लब फेकत सुवर्णपदक जिंकले. त्याने या कामगिरीसह स्पर्धेचा नवा विक्रम प्रस्थापित केला. याच प्रकारात धर्मबीरने 27.71 मीटरच्या कामगिरीसह कांस्यपदक मिळवले. अनुभवी खेळाडू अमित कुमार सरोहा 27.26 मीटर अंतरासह पाचव्या स्थानावर राहिला. त्यामुळे या प्रकारात भारताला तिन्ही पदके जिंकण्याची संधी हुकली.
एशियन पॅरा गेम्स 2026 मध्ये भारताने आतापर्यंत 30 सुवर्ण, 35 रौप्य आणि 49 कांस्य अशी एकूण 114 पदके जिंकली आहेत. चीनमधील हांगझोऊ येथे 2023 मध्ये झालेल्या स्पर्धेत भारताने 111 पदके जिंकली होती. यंदा भारताने हा विक्रम मागे टाकला आहे. तसेच, मागील स्पर्धेतील 29 सुवर्णपदकांचा आकडाही भारताने ओलांडला आहे.
दरम्यान, संदीपने पुरुषांच्या 100 मीटर टी-64 प्रकारात 11.67 सेकंदांची वेळ नोंदवत कांस्यपदक जिंकले. यापूर्वी त्याने 400 मीटर टी-64 प्रकारात सुवर्णपदक मिळवले होते.
F4 इंडियन चॅम्पियनशिपमध्ये लुविवे साम्बुडला याचा ‘डबल धमाका’; 15 वर्षीय अॅरॉन मेहताने रचला इतिहास!
बॅडमिंटनमध्येही भारतीय खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. थुलसिमथी मुरुगेसन आणि मानसी जोशी या जोडीने महिला दुहेरी एसएल 3-एसयू 5 प्रकारात चीनच्या किउक्सिया यांग आणि झुक्सियान जिओ या जोडीचा 21-16, 21-13 असा सरळ गेममध्ये पराभव करत सुवर्णपदक पटकावले. या विजयासह भारतीय जोडीने 2025 च्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीतील पराभवाची परतफेड केली. याआधी थुलसिमथीने नितेश कुमारसोबत मिश्र दुहेरी एसएल 3 -एसयू 5 प्रकारात रौप्यपदक जिंकले होते.
भारतीय खेळाडूंच्या या दमदार कामगिरीमुळे एशियन पॅरा गेम्समध्ये भारताची पदकतालिकेतील स्थिती अधिक मजबूत झाली आहे.
Ans: महेंद्र गुर्जरने रौप्यपदक, तर संदीप सरगरने कांस्यपदक जिंकले.
Ans: भारताने 30 सुवर्ण, 35 रौप्य आणि 49 कांस्य अशी एकूण 114 पदके जिंकली आहेत.
Ans: थुलसिमथी मुरुगेसन आणि मानसी जोशी यांनी महिला दुहेरी एसएल3-एसयू5 प्रकारात सुवर्णपदक जिंकले.