
History made in Ranji Trophy! Shortest match played; 25 wickets lost in a single day
Ranji Trophy 2025 : देशात सध्या रणजी ट्रॉफी २०२५ चा थरार सुरू आहे. रणजी ट्रॉफी स्पर्धेत एक इतिहास घडला आहे. या स्पर्धेत आसाम विरुद्ध सेनादल यांच्यात झालेला सामना हा फक्त दोन दिवसांत संपला आहे. या स्पर्धेतील दुसऱ्या फेरीत आसाम विरुद्ध सेनादल सामन्याचा निकाल दुसऱ्याच दिवशी लागून रणजी ट्रॉफी इतिहासात असे पहिल्यांदाच घडले आहे. तसेच हा सामना अर्थांनी अनोखा ठरला आहे.
भारतीय क्रिकेटच्या इतिहासात या सामन्याची नोंद झाली आहे. ९० वर्षांच्या रणजी ट्रॉफी स्पर्धेच्या इतिहासातील हा सर्वात लहान सामना ठरला. इतकेच नाही, तर एकाच दिवसात २५ विकेट्स गेल्या आणि दोन गोलंदाजांनी एकाच डावात हॅट्ट्रिकही घेतल्या. हा सामना केवळ ९० षटकांचा झाला. या सामन्यात रियान परागच्या नेतृत्वातील आसाम संघाला ८ विकेट्सने पराभवाचा सामना करावा लागला. सामन्यात ९० षटके झाले, ४ सत्रांचाच खेळ झाला, ३५९ धावा झाल्या आणि एकूण ३२ विकेट्स पडल्या. तिनसुकिया डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स असोसिएशन मैदानावर हा सामना झाला. या मैदानात तब्बल २५ वर्षांनी सामना झाला आणि हा सामना अविस्मरणीयही राहिला.
या सामन्यात आसामने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण दुसऱ्याच षटकात पुलकित नारंगने परवेज मुसरफला आणि चौथ्या षटकात कर्णधार देनिश दास यांना शून्यावर बाद केले. त्यानंतर प्रद्युन सैकिया आणि रियान पराग यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. परागने आक्रमक खेळ केला. पण १२ वे षटक सामन्याला पूर्णपणे वेगळेच वळण देणारे ठरले. अर्जुन शर्माने गोलंदाजी करताना तिसऱ्या चेंडूवर ३१ धावांत ३६ धावांवर असताना त्याला बाद केले. तो यष्टीचीत झाला. त्यांनंतर पुढच्या सलग दोन चेंडूवर सुमीत घाडीगावकर आणि शिबशंकर रॉय यांना शून्यावर बाद करत हॅट्ट्रिक साजरी केली. तरी प्रद्युन आक्रमक खेळत होता, त्याने अर्धशतकही केले. पण १५ आणि १७ व्या षटकात मोहित जांगराने पुन्हा आसामला मोठे झटके दिले.
त्यानंतर फलंदाजीला उतरलेल्या सेनादल संघालाही फार काही करता आले नाही. त्यांचाही पहिला डाव २९.२ षटकात १०८ धावांवरच संपला. आसामच्या रियान पराग आणि राहुल सिंग यांच्या गोलंदाजीपुढे सेनादलच्या संघानेही संघर्ष केला. रियान आणि राहुल यांनी मिळून ९ विकेट्स घेतल्या रियान परागने ५ तर राहुलने ४ विकेट्स घेतल्या. सेनादलकडून इरफान अलीने केलेल्या नाबाद ५१ धावांच्या खेळीमुळे किमान त्यांना ५ धावांची आघाडी घेता आली. त्यानंतर पुन्हा आसाम संघ फलंदाजीला उतरला.
हेही वाचा : ‘2027 चा विश्वचषक कारकिर्दीचा शेवट…’, एबी डिव्हिलियर्सचे Virat Kohli बद्दल खळबळजनक विधान
दुसऱ्या डावात आणखी बिकट अवस्था झाली. पहिल्या दिवसअखेर आसामने ५ विकेट्स ५६ धावांवरच गमावल्या. यात रियान परागचाही समावेश होता. तसेच कर्णधार देनिश दासनेही १० धावांवर विकेट गमावली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी उर्वरित पाच विकेट्सही आसामने झटपट गमावल्या. आसामचा दुसरा डाव २९.३ षटकात ७५ धावांवरच संपला. पहिल्या डावातील ५ धावांमुळे सेनादलला ७१ धावांचे लक्ष्य मिळाले. ७१ धावांचे लक्ष्य सेनादलाने १३.५ षटकात दोन विकेट्स गमावत सहज पूर्ण केले.