
फोटो सौजन्य - सोशल मिडिया
ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लड यांच्यामध्ये कसोटी मालिका पार पडली, या मालिकेच्या पहिल्या तीन सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाने धूमाकुळ घातला आणि इंग्लडच्या संघाला तीनही सामन्यामध्ये पराभूत करुन मालिका नावावर केली आहे. त्यानंतर सोशल मिडियावर इंग्लडच्या संघाला ट्रोल केले जात आहे, त्याचबरोबर आता क्रिकेट चाहत्यांनी तर इंग्लिश संघाला ट्रोल केलेच पण ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी देखील या संघाची खिल्ली उडवली आहे. जेव्हा ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ विजयाचा आनंद साजरा करतो तेव्हा कोणीही त्यांची बरोबरी करू शकत नाही. याचे आणखी एक उदाहरण म्हणजे ऑस्ट्रेलियाचा इंग्लंडविरुद्धचा अॅशेस विजय.
कांगारूंनी या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिले तीन सामने जिंकून अॅशेस कायम राखली. मालिकेत अजिंक्य आघाडी घेतल्यानंतर, ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी पार्टी करून आनंद साजरा केला. या पार्टीदरम्यान, ‘रॉनबॉल’ ने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ऑस्ट्रेलियाने इंग्लंड संघाची खिल्ली उडवण्यासाठी त्याचा वापर केला. हे फोटो व्हायरल झाल्यानंतर, चाहते या ‘रॉनबॉल’चा नेमका अर्थ काय हे जाणून घेण्यास उत्सुक आहेत.
जेव्हा इंग्लंडने निर्भयपणे आणि आक्रमकपणे कसोटी क्रिकेट खेळायला सुरुवात केली, तेव्हा सर्वांनी त्यांचे प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलम यांना याचे श्रेय दिले. मॅक्युलमने त्याच्या संपूर्ण कारकिर्दीत अशाच पद्धतीने फलंदाजी केली. यामुळे इंग्लंडची खेळण्याची शैली क्रिकेट जगतात “बॅझबॉल” म्हणून ओळखली जाऊ लागली. बॅझ हे मॅक्युलमचे टोपणनाव आहे.
इंग्लंडच्या बॅजबॉलची खिल्ली उडवण्यासाठी ऑस्ट्रेलियाने नवीन “रॉनबॉल” सादर केला. ऑस्ट्रेलियाच्या पार्टी सेलिब्रेशन दरम्यान, त्यांच्या टी-शर्टवर “रॉनबॉल” असे लिहिलेले कार्टून चित्र होते. ऑस्ट्रेलियाचा “रॉनबॉल” देखील त्यांच्या प्रशिक्षकाशी संबंधित आहे. ‘रॉनबॉल’ हा शब्द मुख्य प्रशिक्षक अँड्र्यू मॅकडोनाल्ड यांच्या संदर्भात होता, ज्यांचे टोपणनाव ‘रोनाल्ड’ आहे (फास्ट-फूड आयकॉन रोनाल्ड मॅकडोनाल्ड यांच्या पहिल्या नावावरून).
As Adelaide Mayor Travis Head made ‘Ronball’ t-shirts to launch his 48-hour Ashes party bonanza. Go inside the Aussie’s Ashes celebrations ▶️ https://t.co/VWqnZetEXf pic.twitter.com/01nkwmfs63 — CODE Cricket (@codecricketau) December 21, 2025
ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या टी-शर्टवरील व्यंगचित्र त्यांचे प्रशिक्षक अँड्र्यू मॅकडोनाल्ड यांचे आहे. असे सांगितले जात आहे की, अॅशेस विजयाच्या सेलिब्रेशन दरम्यान ऑस्ट्रेलियन सलामीवीर ट्रॅव्हिस हेडने हा टी-शर्ट वाटला होता.
अॅडलेडमधील तिसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या विजयात ट्रॅव्हिस हेडने अॅलेक्स कॅरीसह महत्त्वाची भूमिका बजावली. पहिल्या डावात केरीने शतक झळकावले आणि त्यानंतर दुसऱ्या डावात ५० पेक्षा जास्त धावा केल्या. दरम्यान, हेडने दुसऱ्या डावात १७२ धावांची धमाकेदार खेळी करत इंग्लंडला सामन्यातून पूर्णपणे बाहेर काढले.