यूएई : आशिया कप (Asia Cup 2022) स्पर्धेत पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान (Paksitan Vs Afgansitan) यांच्यात झालेल्या अत्यंत अटीतटीच्या सामन्यात अफगाणिस्तानला पाकिस्ताविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यात पाकिस्तानचा फलंदाज आसिफ अली (Asif Ali) आणि अफगाणिस्तानचा वेगवान गोलंदाज फरीद अहमद मलिक (Ahamad Malik) यांच्यात सामन्यादरम्यान शेवटच्या षटकात हाणामारी झालीय. या घटनेची दखल घेत आयसीसीने आसिफ अली आणि फरीद अहमद मलिक यांच्यावर मोठी कारवाई केली असून आयसीसीने दोन्ही खेळाडूंना मॅच फीच्या २५ टक्के दंड ठोठावला आहे.
आयसीसीने (ICC) म्हटले आहे की, आसिफने आंतरराष्ट्रीय सामन्यादरम्यान आयसीसी आचारसंहितेच्या कलम २. ६ चे उल्लंघन केले, जे खेळाडू आणि त्याच्या समर्थन व्यक्तीशी संबंधित आहे. त्याच वेळी फरीदने कलम २. १. १२ तोडले आहे जे खेळाडू, पंच आणि सामनाधिकारी यांच्या अयोग्य शारीरिक वर्तनाशी संबंधित आहे. हे पाहता आयसीसीने दोन्ही खेळाडूंच्या मॅच फीच्या २५ टक्के इतका मोठा दंड ठोठावला आहे.
काय आहे नेमके प्रकरण :
दुबईत पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात रोमांचक सामना झाला. भर मैदानात खेळाडूंमध्ये हमरीतुमरी झाली, बॅटही उगारण्यात आली. त्यानंतर स्टेडियममध्ये असलेल्या दोन्ही संघांच्या पाठीराख्यांमध्ये जुंपली. पाकिस्तानकडून या घटनेला राजकीय वळण देण्यात येत आहे. या सामन्यात अफगाणिस्तानचा विजय जवळपास निश्चित होता. पाकिस्तानची अखेरची जोडी मैदानात होती, अखेरचे षटक फारूकी टाकत होता. मात्र पाकचा दहाव्या क्रमांकाचा फलंदाज नसीम शाहने दोन षटकार मारून विजय पाकिस्तानकडे खेचून आणला. त्यानंतर अत्यंत जोशात त्याने जल्लोष केला. हे पाहून स्टेडियममधील अफगाणिस्तान प्रेक्षकांचा संयम सुटला, त्यांनी पाकिस्तानी प्रेक्षकांना टार्गेट केले. खुर्च्या उखडून त्यांनी फेकण्यास सुरुवात केली.