गुजरात येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘राष्ट्रीय खेळ २०२२’ या स्पर्धेचे उदघाटन २९ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते केले जाणार आहे. दुपारी ४:३० वाजता हा उदघाटन सोहोळा होणार असून ही स्पर्धा गुजरातमधील सहा शहरांमध्ये होणार आहे. बऱ्याच वर्षांनी या स्पर्धेचे आयोजन केले गेले असून यात तब्बल ७ हजार अॅथलीट्सचा सहभाग असणार आहे.
अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये (Narendra Modi Stadium) या स्पर्धेचे उदघाटन होणार असून यावेळी पंतप्रधान देशाच्या खेळाडूंना संबोधित करणार आहेत. बॅडमिंटनपटू पी.व्ही.सिंधू आणि ऑलिम्पिकमध्ये दोन वेळा पदक जिंकणारी सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा उपस्थित राहणार आहेत.
२९ सप्टेंबर ते १२ ऑक्टोबर या कालावधीत चालणाऱ्या या राष्ट्रीय खेळांमध्ये २८ राज्ये आणि आठ केंद्रशासित प्रदेशातील सुमारे ७ हजार खेळाडू आणि भारतीय सशस्त्र दलातील क्रीडा संघही राष्ट्रीय खेळांमध्ये सहभागी होणार आहेत. काही स्पर्धांना उदघाटनापूर्वी सुरुवात झाली असून तर शुक्रवारपासून अनेक क्रीडा स्पर्धा रंगणार आहेत. सात वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा होत आहेत. कार्यक्रमाची सुरुवात २० ते २४ सप्टेंबर दरम्यान टेबल टेनिस स्पर्धेने झाली आहे.
गुजरातमधील अहमदाबाद, गांधीनगर, सुरत, वडोदरा, राजकोट आणि भावनगर या सहा शहरांमध्ये हे खेळ होणार आहेत. तर केवळ ट्रॅक सायकलिंगचा कार्यक्रम दिल्लीतील वेलोड्रोम येथे होणार आहे. २०१५ रोजी राष्ट्रीय खेळांची स्पर्धा केरळमध्ये आयोजित केली होती. त्यांनतर गोव्याला २०१६ मध्ये पुढील राष्ट्रीय खेळांचे आयोजन करायचे होते, परंतु काही कारणांमुळे हा कार्यक्रम होऊ शकला नाही.