फोटो सौजन्य - BCCI सोशल मीडिया
भारत विरुद्ध इंग्लंड – हार्दिक पंड्या : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये सुरु असलेल्या मालिकेचा ३१ जानेवारी रोजी चौथा सामना झाला. यामध्ये भारताच्या संघाने इंग्लंडच्या संघाला पराभूत करून ५ सामन्यांच्या मालिकेत ३-१ अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. भारताच्या संघाची सुरुवातीला सामन्यांमध्ये हालत खिळखिळी झाली होती. भारताच्या संघाने पहिल्या दोन ओव्हरमध्ये ३ विकेट्स गमावले होते. त्यानंतर टीम इंडियाचा फलंदाज अभिषेक शर्मा आणि रिंकू सिंह यांनी संघाला आधार दिला आणि टीम इंडियाने सामन्यांमध्ये पुनरागमन केले.
टीम इंडियाने चौथ्या T२० सामन्यात इंग्लंडचा १५ धावांनी पराभव केला आहे. हा सामना जिंकल्यानंतर टीम इंडियाने ५ सामन्यांच्या मालिकेत ३-१ अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. या सामन्यात टीम इंडियाचा स्टार खेळाडू हार्दिक पंड्याने शानदार कामगिरी केली. त्याने अवघ्या ३० चेंडूत ५३ धावा केल्या. त्याने चार चौकार आणि चार षटकार मारले. या काळात त्याने एक मोठा विक्रम केला आहे.
On we go 🇮🇳❤️ Series sealed! Top, top performance by the team. pic.twitter.com/mmgMwLmTn5
— hardik pandya (@hardikpandya7) January 31, 2025
चौथ्या T२० सामन्यात हार्दिक पांड्याने आपल्या T२० कारकिर्दीतील पाचवे अर्धशतक झळकावले. यासह पांड्या T२० मध्ये १५०० हून अधिक धावा करणारा, ५० हून अधिक विकेट घेणारा आणि पाच T२० अर्धशतके करणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. त्याचबरोबर त्याच्याआधी शाकिब अल हसन, मोहम्मद नबी आणि सिकंदर रझा यांनीही ही कामगिरी केली आहे. हार्दिक पांड्याने आपल्या T२० कारकिर्दीत आतापर्यंत १८०३ धावा केल्या आहेत आणि ९४ बळी घेतले आहेत.
पुण्यातील सामना भारतीय संघासाठी चढ-उतारांनी भरलेला होता. प्रथम फलंदाजी करताना भारताने दुसऱ्या षटकातच तीन विकेट गमावल्या. मात्र, रिंकू सिंगने ३२ धावांची खेळी करत डाव सांभाळला. यानंतर पांड्या आणि शिवम दुबे यांनी ८७ धावांची शानदार भागीदारी केली. या भागीदारीच्या जोरावर टीम इंडियाने २० षटकांत ९ गडी गमावून १८१ धावा केल्या.
प्रत्युत्तरात इंग्लंडला फिल सॉल्ट आणि बेन डकेट या सलामीवीरांनी चांगली सुरुवात करून दिली. यानंतर हॅरी ब्रूकच्या अर्धशतकाने इंग्लंडची स्थिती मजबूत झाली होती. मात्र, यानंतर हर्षित राणा, रवी बिश्नोई आणि वरुण चक्रवर्तीने सामन्याचा मार्ग बदलला. राणा आणि बिश्नोईने प्रत्येकी तीन, तर वरुणने दोन गडी बाद केले. अखेरीस इंग्लंडचा संघ केवळ १६६ धावांवर गडगडला.
भारताचा संघ मालिकेचा शेवटचा सामना मुंबईमधील वानखेडे स्टेडियमवर खेळणार आहे. या सामन्याचे आयोजन २ फेब्रुवारी रोजी करण्यात आले आहे.