
IND vs PAK: India and Pakistan will face each other again in the final! The grand match for the Asia Cup championship will be held on this day.
IND vs PAK U19 Asia Cup Final 2025: अंडर-19 आशिया कप 2025 च्या पहिल्या सेमीफायनलमध्ये भारताने श्रीलंकेचा 8 विकेट्सने धुव्वा उडवत विक्रमी दहाव्यांदा जेतेपदाच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. यामुळे आता अंतिम सामन्यात अंडर-19 आशिया कप 2025 चा अंतिम सामना आता आणखी रोमांचक झाला आहे. कारण आता भारत आणि पाकिस्तानने उपांत्य फेरीत विजय मिळवून जेतेपदाच्या लढतीत आपले स्थान पक्के केले आहे. हे दोन्ही कट्टर प्रतिस्पर्धी आता अंतिम फेरीत देखील आमनेसामने येणार आहेत.
हेही वाचा : पाकिस्तानी कबड्डी खेळाडूच्या अडचणीत वाढ! भारतीय संघासोबत खेळल्याने PKF देणार कडक शिक्षा
आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखालील भारतीय अंडर-19 संघाने उपांत्य फेरीमध्ये श्रीलंकेचा 8 विकेट्सने पराभव करून अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला. 19 वर्षांखालील आशिया कप हा सहसा 50 षटकांचा असतो, परंतु सततच्या पावसामुळे आणि दुबईतील ओल्या मैदानामुळे उपांत्य फेरीचा सामना प्रत्येकी 20 षटकांचा खेळवण्यात आला. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने 20 षटकांत 8 विकेट्स गमावून 138 धावा उभ्या केल्या होत्या. भारताला विजयासाठी १३९ धावांचे लक्ष्य मिळाले.
लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली नाही. कर्णधार आयुष म्हात्रे आणि वैभव सूर्यवंशी झटपट बाद झाले. अवघ्या २५ धावांत दोन महत्त्वाच्या विकेट गमावल्यानंतर, भारतावर दबाव येऊ शकतो असे वाटत होते. यानंतर, आरोन जॉर्ज आणि विहान मल्होत्राने उत्कृष्ट फलंदाजी दाखवली आणि संघाचा डाव सवरला. दोन्ही फलंदाजांनी कधी संयम आणि कधी आक्रमकतेचे दर्शन घडवत श्रीलंकेच्या गोलंदाजांवर चांगलाच दबाव आणला. आरोन जॉर्जने ४९ चेंडूत नाबाद ५८ धावा फटकावल्या. यामध्ये त्याने चार चौकार आणि एक षटकार लगावला. तर विहान मल्होत्राने ४५ चेंडूत नाबाद ६१ धावा काढल्या. ज्यामध्ये चार चौकार आणि दोन षटकारांचा समावेश आहे.
दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात, पाकिस्तानने बांगलादेशचा ८ विकेट्सने पराभव केला. पावसामुळे सामना २७ षटकांचा खेळवण्यात आला होता. प्रथम फलंदाजी करणाऱ्या बांगलादेशचा संघ १२१ धावांतच गारद झाला. प्रत्युत्तरात पाकिस्तानने केवळ १६.३ षटकांतच लक्ष्य गाठले आणि अंतिम फेरीत प्रवेश केला.
हेही वाचा : IND U19 vs SL U19 : सेमीफायनलमध्ये भारताकडून श्रीलंकेचा धुव्वा! दिमाखात केली दहाव्यांदा अंतिम फेरीत एंट्री
१९ वर्षांखालील आशिया कप २०२५ चा अंतिम सामना रविवारी खेळवण्यात येणार आहे. जिथे भारत आणि पाकिस्तान एकमेकांसमोर येणार आहेत. भारताने गट टप्प्यात पाकिस्तानचा पराभव केला असून अंतिम फेरीत कोणता संघ दबावाखाली चांगली कामगिरी करतो हे पाहणे महत्वाचे असणार आहे.