IND VS PAK: The handshake controversy is fresh and something happened; India-Pakistan players gave each other high-fives...
India vs Pakistan Sultans of Johor Cup : मागील महिन्यात दुबई येथे आशिया कप २०२५ स्पर्धा पार पडली. या सामन्यात भारत आणि पाकिस्तान आमनेसामने आले होते. या सामन्यात भारताने पाकिस्तानचा ५ विकेट्सने पराभव केला. या संपूर्ण स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान संघातील खेळाडूंमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. भारत आणि पाकिस्तान संघ ३ वेळा या स्पर्धेत आमनेसामने आले होते, परंतु भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंसोबत हस्तांदोलन केले नव्हते. त्यावरून बरेच वाद रंगले होते. मात्र आता मलेशियातील जोहोर बहरू येथील तमन दया हॉकी स्टेडियमवर मात्र या दोन देशांच्या खेळाडूंनी हस्तांदोलन करण्याऐवजी हाय-फाइव्ह दिला. त्यामुळे आता चर्चा रंगू लागली आहे.
मलेशियातील जोहोर बहरू येथील तमन दया हॉकी स्टेडियमवर भारतीय पुरुष ज्युनियर हॉकी संघ सुलतान जोहोर कप सामन्यात पाकिस्तानसोबत दोन हात करत आहे. हा सामना दोन्ही संघांनी हस्तांदोलन करण्याऐवजी हाय-फाइव्ह दिल्याने सुरू करण्यात आला. मागील अहवालांनुसार पाकिस्तान हॉकी फेडरेशनने त्यांच्या खेळाडूंना अलीकडील आशिया कप क्रिकेट वादाप्रमाणेच हस्तांदोलन न करण्याचा इशारा देण्यात आला होता. भारतीय क्रिकेट संघाने गेल्या महिन्यात त्यांच्या तिन्ही सामन्यांदरम्यान पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन करण्यास नकार दिला होता.
यापूर्वी, पीएचएफच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले की, खेळाडूंना भारतीय संघाच्या हात न हलवण्याच्या धोरणासाठी मानसिकदृष्ट्या तयार राहण्यासाठी सांगण्यात आले होते. ते म्हणाले की, “खेळाडूंना सांगण्यात आले आहे की जर भारतीय खेळाडू सामन्यापूर्वी किंवा नंतर हस्तांदोलन करत नसतील तर त्यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष करायला हवे आणि पुढे जावे. त्यांना खेळादरम्यान कोणताही भावनिक संघर्ष टाळण्यास देखील सांगितले गेले आले आहे.”
ऑगस्टमध्ये बिहारमधील राजगीर येथे खेळवण्यात आलेल्या पुरुषांच्या आशिया कपसाठी पाकिस्तानने आपला संघ भारतात पाठवण्यास नकार दिला. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, भारतीय क्रिकेट संघाने नुकत्याच संपलेल्या आशिया कप स्पर्धेत अंतिम सामन्यासह तीन सामन्यात पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन करण्यास नकार दिला होता. यामुळे चांगलाच वाद निर्माण झाला आणि पाकिस्तानने आशियाई क्रिकेट परिषद आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदकडे निषेध नोंदवला होता.