रवींद्र जडेजा(फोटो-सोशल मिडिया)
Ind vs WI : अरुण जेटली स्टेडियमवर वेस्ट इंडिजविरुद्ध दुसरी कसोटी खेळली गेली. या सामन्यात भारताने वेस्ट इंडिजला पराभूत करत २-० असा विजय मिळवला. या मालिकेत भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने शानदार कामगिरी करत सर्वांना प्रभावित केले. त्याने केवळ शतकच नाही तर आठ विकेट्स देखील घेतल्या. या कामगिरीसाठी रवींद्र जडेजाला मालिकावीर म्हणून निवडण्यात आले, तर दिल्ली कसोटीत आठ विकेट्स घेणाऱ्या कुलदीप यादवची सामनावीर म्हणून निवड करण्यात आली.
मालिकावीर म्हणून निवड झाल्यानंतर रवींद्र जडेजाने प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला की, “एक संघ म्हणून, आम्ही फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीमध्ये देखील चांगली कामगिरी करत आहोत. गेल्या पाच ते सहा महिन्यांत आम्ही कोणत्या प्रकारचे क्रिकेट खेळलो आहोत हे आम्हाला माहिती असून एक संघ म्हणून, हे एक चांगले लक्षण आहे की आम्ही दीर्घकाळ असेच करत राहणार आहोत.”
हेही वाचा : Ind vs WI : भारताकडून वेस्ट इंडिजचा सुफडा साफ! क्लीन स्वीप देऊन गिल आर्मीने साधली जागतिक विक्रमाशी बरोबरी
त्याच्या फलंदाजीच्या स्थानाबद्दल सांगताना जडेजा म्हणाला की, “गौतम गंभीरने म्हटल्याप्रमाणे, मी आता सहाव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येतो. म्हणून मी एका चांगल्या फलंदाजासारखा विचार करत आहे. ते माझ्यासाठी काम करत आहे. पूर्वी, अनेक वर्षांपासून, मी आठव्या आणि नवव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येत असे, म्हणून माझी मानसिकता आतापेक्षा थोडी वेगळी होती. जेव्हा जेव्हा मला फलंदाजी करण्याची संधी मिळते तेव्हा मी फक्त क्रीजवर जास्त वेळ घालवण्याचा प्रयत्न करत असतो.”
जडेजा पुढे रेकॉर्डबद्दल म्हणाला की, “मी रेकॉर्डबद्दल जास्त विचार करत नसून मी फक्त माझ्या संघाला जिंकण्यास मदत करण्यासाठी बॅट आणि बॉल दोन्हीने योगदान देण्यावर जास्त लक्ष केंद्रित करतो. मला वाटत की ही माझी तिसरी मॅन ऑफ द सिरीज ट्रॉफी आहे. मी खूप आनंदी आहे.”
दरम्यान, दुसऱ्या कसोटीत ८ विकेट्स घेणारा कुलदीप यादव सामनावीरासाठी निवडण्यात आला. तो म्हणाला की, “ही पूर्णपणे वेगळी विकेट होती. येथे जास्त षटके टाकणे हे एक आव्हान होते. मला येथे गोलंदाजी करायला मजा येत होती. कोणताही ड्रिफ्ट नव्हता. विकेट खूपच कोरडी होती. मला जास्त षटके टाकणे आणि विकेट घेणे नेहमीच आवडते. मला फलंदाजांना बाद करणे आवडते.”