
This Indian player announced his retirement during the Australia-India series; said goodbye to cricket at the age of 36
Parvez Rasool retires from cricket : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मलिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिलं सामना पर्थ येथे खेळला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा ७ विकेट्सने पराभव केला आहे. या मालिकेदरम्यान एका भारतीय खेळाडूने अचानक निवृत्ती जाहीर केली आहे. परवेझ रसूल या भारतीय खेळाडूने सर्व प्रकारातून निवृत्तीची घोषणा केली आहे. १५ जून २०१४ रोजी भारतासाठी परवेझ रसूलनेने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. रसूल हा भारतासाठी खेळणारा जम्मू-काश्मीरचा पहिला क्रिकेटपटू ठरला होता. तथापि, त्याने आता सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे.
भारताकडून एकदिवसीय सामने खेळणारा जम्मू-काश्मीरचा पहिला क्रिकेटपटू परवेझ रसूलने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. ३६ वर्षीय या अष्टपैलू खेळाडूने १८ ऑक्टोबर रोजी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला आपल्या निर्णयाविषयी कळवले. परवेझ रसूलने १५ जून २०१४ रोजी मीरपूर येथे बांगलादेशविरुद्ध पहिला एकदिवसीय सामना खेळला. त्या सामन्यात त्याने १० षटकांत ६० धावा देत दोन विकेट काढल्या आहेत. २६ जानेवारी २०१७ रोजी कानपूर येथे इंग्लंडविरुद्ध खेळलेल्या त्याच्या एकमेव टी-२० सामन्यात त्याने ५ धावा केल्या होत्या, तसेच त्याने गोलंदाजीमध्ये ३२ धावा देऊन एक विकेट घेतली होती.
हेही वाचा : IND VS AUS : ना गिल, ना जयस्वाल..! ‘हा’ सर्व फॉरमॅटमध्ये महान खेळाडू होणार; ‘हिटमॅन’ शर्माचे भाकीत
परवेझ रसूलची देशांतर्गत कारकीर्द प्रभावी राहिली आहे. त्याने ९५ प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने ५,६४८ धावा केल्या आणि ३५२ विकेट्स घेतल्या आहेत. त्याने १६४ लिस्ट ए सामने आणि ७१ टी-२० सामने देखील खेळले आहेत. त्याला रणजी ट्रॉफीमध्ये दोनदा (२०१३/१४ आणि २०१७/१८) सर्वोत्तम ऑलराउंडरसाठी लाला अमरनाथ ट्रॉफी पुरस्कार देण्यात आला आही. आयपीएलमध्ये, त्याने पुणे वॉरियर्स इंडिया, सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी एकूण ११ सामने देखील खेळले आहेत.
निवृत्ती जाहिर केल्यानंतर रसूलने स्पोर्टस्टारला प्रतिक्रिया दिली. त्याने सांगितले की, “जेव्हा आम्ही खेळायला सुरुवात केली तेव्हा अनेकांनी जम्मू आणि काश्मीर क्रिकेटला गांभीर्याने घेतले नव्हते. आम्ही काही मोठ्या संघांना पराभूत करण्याची किमया साधली आणि रणजी ट्रॉफी आणि इतर बीसीसीआय-संलग्न स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करून दाखवली. मी बराच काळ संघाचे नेतृत्व केले आणि संघाच्या यशोगाथेत थोडेसे योगदान दिल्याने मला खूप समाधान आहे.”
हेही वाचा : मनहास, गिलसह आणि कुलदीप यादव यांना लॉटरी; दिवाळीला मिळाली ‘गोड’ बातमी; वाचा सविस्तर