
Minister Jyotiraditya Scindia's son involved in an accident! Madhya Pradesh Cricket Association president Mahaaryaman narrowly escaped unhurt.
Mahaaryaman Scindia’s accident : मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष असलेले महाआर्यमन सिंधिया यांचा अपघात झालेची बातमी समोर आली आहे. मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांचे पुत्र आणि मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष महाआर्यमन दोन दिवसांच्या शिवपुरी दौऱ्यावर असताना शिवपुरी भेटीदरम्यान अपघात झाला आहे. या दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी कोलारस विधानसभा मतदारसंघातील युवा परिषदेत सहभागी झाले होते.
हेही वाचा : विश्वचषक महत्त्वाची भूमिका बजावणार! क्रिकेटमध्ये झिम्बाब्वेला आदर मिळवून देण्याचा कर्णधार रझाचा निर्धार
मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष महाआर्यमन यांनी कॉलेजच्या मैदानावर शिवपुरी आयोजित क्रिकेट स्पर्धेला भेट दिली. यावेळी तिथे त्यांचे समर्थक स्वागतासाठी उपस्थित होते. एका मिडिया रिपोर्टनुसार, महाआर्यमन हे त्यांचं स्वागत स्वीकारण्यासाठी गाडीच्या सनरूफबाहेर येत अभिवादन स्विकारत असताना ते झुकले होते. तेव्हा चालकाने अचानक ब्रेक लावल्यामुळे त्यांची छाती गाडीच्या पुढच्या भागावर आदळली आणि त्यांना त्यामध्ये दुखापत झाली. दुखापतीकडे त्यांनी सुरुवातीला दुर्लक्ष करून आपला दौरा सुरुच ठेवला. पण संध्याकाळी त्यांच्या छातीत दुखू लागल्याने तात्काळ शिवपुरी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे सिटी स्कॅन करण्यात आले. या दुखापतीमुळे ते बामौरा येथील कार्यक्रमाला जाऊ शकले नाहीत, रुग्णालयात दाखल केल्यानंतर ४० मिनिटांनी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांना आराम करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
महाआर्यमन सिंधिया यांना मस्क्युलर इंजरी झाली असल्याचे प्राथमिक वृत्त समोर आले आहे. आपल्या प्रकृतीबाबत त्यांनी ट्विट करून माहिती दिली. त्यांनी लिहिले की, ‘तुम्हा सर्वांची चिंता, प्रार्थना आणि आशीर्वादामुळे मनापासून आभार. देवाच्या कृपेने सर्वकाही ठीक आणि व्यवस्थित आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर काही काळ आराम करत आहे. या काळात आपल्याकडून मिळालेलं प्रेम, संवेदना आणि आशीर्वादासाठी मी तुमचा ऋणी आहे.’
तसेच महाआर्यमन सिंधिया यांच्यावर देखरेख ठेवणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं की, “महाआर्यमन यांच्या स्नायूंना दुखापत झाली असून त्यांना औषध देण्यात आले आहे. तसेच बेल्ट घालण्याचा सल्ला देखील देण्यात आला आहे. मंगळवारी त्यांची दुसरी वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे.”