MS Dhoni Retirement: Will MS Dhoni play IPL next year too? CSK captain's smiling answer, read in detail..
MS Dhoni Retirement : आयपीएल २०२५ च्या काल झालेल्या ४९ व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जला पंजाब किंग्जने पराभवाची धूळ चारली. या परभवासोबतच चेन्नईचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. सामन्यापूर्वी, पंजाब किंग्जने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने सॅम करनच्या ८८ धावांच्या जोरावर किंग्जसमोर १९० धावांचे लक्ष्य उभे केले होते. परंतु, पंजाबने प्रभसीमरन आणि अय्यरच्या अर्धशतकांच्या जोरावर हे लक्ष्य सहज पूर्ण करून विजय प्राप्त केला. यावेळी सामन्यापेक्षा चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीची चर्चा जास्त रंगली होती. ज्यावर धोनीने स्वतः उत्तर दिले आहे.
चेन्नई सुपर किंग्जसाठी आयपीएल २०२५ चा १८ वा हंगाम खूपच वाईट जात आहे. चेन्नईच्या संघाला आतापर्यंतच्या ९ सामन्यांपैकी फक्त २ सामने जिंकता आले आहेत. त्यामुळे तो पॉइंट टेबलमध्ये हा संघ तळाशी जाऊन पोहचला आहे. पंजाबविरुद्ध झालेल्या पराभवाने चेन्नई आता अधिकृतपणे प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडली आहे. त्यांच्या प्लेऑफच्या आशा मावळल्या आहेत.
अशातच चाहत्यांच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला आहे, की एमएस धोनी पुढील आयपीएल हंगामात खेळणार आहे की नाही, चेन्नई विरुद्ध पंजाब सामन्यापूर्वी जेव्हा धोनी नाणेफेकीसाठी मैदानात आला होता, तेव्हा त्याला हाच प्रश्न विचारला गेला. या प्रश्नावर धोनी हसून म्हणाला की, “मला स्वतःला देखील माहित नाही की, मी पुढचा सामना खेळेन की नाही.”
नियमित कर्णधार ऋतुराज गायकवाड दुखापतीच्या कारणाने बाहेर पडल्यामुळे महेंद्रसिंग धोनी सध्या चेन्नईचे नेतृत्व करत आहे. धोनी आता ४४ वर्षांचा आहे, त्यामुळे तो क्रिकेटमधून कधी निवृत्त होणार? हे लोकांना जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण होत आहे.
पंजाबविरुद्ध नाणेफेक झाली तेव्हा डॅनी मॉरिसन मैदानावर उपस्थित होता. धोनी येताच संपूर्ण स्टेडियम ‘धोनी-धोनी’ अशा घोषणांनी दुमदुमून गेले होते. डॅनीने धोनीला विचारले की, तो पुढच्या वर्षीही आयपीएल खेळेल का? या प्रश्नाला धोनीने हसून सांगितले की त्याला स्वतःला देखील माहित नाही की, तो पुढचा हंगाम खेळेल की नाही. या उत्तरानंतर, पुन्हा एकदा संपूर्ण मैदान धोनीच्या नावाने गुंजून उठले.
The Thala Magic at the toss. 😂👏 pic.twitter.com/YvXjplWlhW
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) April 30, 2025
यानंतर, धोनीने संघाच्या खराब कामगिरीबद्दल देखील प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला की, आम्ही आमच्या घरच्या मैदानाचा फायदा घ्यायला हवा होता, पण यावेळी आम्ही ते करू शकलो नाही. तो म्हणाला की, चेन्नई सहसा जास्त बदल करत नाही, परंतु यावेळी खराब कामगिरीमुळे अनेक बदल करावे लागले आहेत. मोठ्या लिलावानंतर हा पहिलाच हंगाम राहिला आहे, त्यामुळे खेळाडूंना समजण्यासाठी थोडा वेळ असल्याचे देखील त्याने सांगितले.