फोटो सौजन्य - BLACKCAPS सोशल मीडिया
केन विल्यमसन – विराट कोहली : सध्या सर्व संघ वेगवेगळ्या देशांमध्ये एकदिवसीय मालिका खेळत आहेत. चॅम्पियन ट्रॉफीला फक्त ८ दिवस शिल्लक राहिले आहेत. याआधी पाकिस्तान, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तिरंगी मालिका खेळवली जात आहे. न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्यात केन विल्यमसनने विराट कोहलीला जोरदार धक्का दिला. या सामन्यात केन विल्यमसनने ११३ चेंडूंचा सामना केला आणि १३३ धावा केल्या. त्याच्या या खेळीत त्याने १३ चौकार आणि २ षटकार मारले. यासह त्याने विराट कोहलीचा एक मोठा विक्रम मोडला.
न्यूझीलंडने हा सामना ६ विकेट्सने जिंकला. एकदिवसीय सामन्यात ७००० धावा पूर्ण केल्या. न्यूझीलंडचा फलंदाज केन विल्यमसन हा ७,००० एकदिवसीय धावा करणारा दुसरा सर्वात जलद क्रिकेटपटू ठरला आहे. केनने त्याच्या १५९ व्या एकदिवसीय डावात ही कामगिरी केली. यापूर्वी विराट कोहलीने १६१ डावांमध्ये ही कामगिरी केली होती. एकदिवसीय सामन्यात सर्वात जलद ७००० धावा करण्याचा विक्रम दक्षिण आफ्रिकेच्या हाशिम अमलाच्या नावावर आहे. त्याने फक्त १५० डावांमध्ये ही कामगिरी केली.
Kane Williamson, the fifth Kiwi to score 7000 ODI runs 🇳🇿 pic.twitter.com/LrlqZ06DD1
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) February 10, 2025
हाशिम आमला – १५० डाव
केन विल्यमसन – १५९ डाव
विराट कोहली – १६१ डाव
सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने ५० षटकांत ६ गडी गमावून ३०४ धावा केल्या. सलामीवीर मॅथ्यू ब्रिट्झकेने १४८ चेंडूत १५० धावा केल्या. त्याच्याशिवाय वियान मुल्डरने ६४ धावा केल्या. प्रत्युत्तरात, न्यूझीलंड संघाने ४८.४ षटकांत ४ गडी गमावून लक्ष्याचा पाठलाग केला. केन विल्यमसनच्या शतकाव्यतिरिक्त, डेव्हॉन कॉनवेने ९७ धावांची खेळी केली.
२०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी पाकिस्तानमध्ये ही तिरंगी मालिका खेळवली जात आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने पाकिस्तानचा ७८ धावांनी पराभव केला. दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेचा ६ गडी राखून पराभव केला. पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा सामना १२ फेब्रुवारी रोजी खेळला जाईल. तसेच, अंतिम सामना १४ फेब्रुवारी रोजी होईल. हा सामना कराची येथील नॅशनल स्टेडियममध्ये खेळला जाईल. २ सामने जिंकून न्यूझीलंड संघाने आधीच अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे.
चॅम्पियन ट्रॉफीमध्ये न्यूझीलंडचा संघ ग्रुप A मध्ये आहे. यामध्ये भारत, पाकिस्तान आणि बांग्लादेश या संघाचा समावेश आहे. तर दुसऱ्या गटामध्ये अफगाणिस्तान, इंग्लड, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया हे संघ आहेत.