इस्लामाबाद : भारतामध्ये 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर दरम्यान एकदिवसीय विश्वचषक (One Day Innings) स्पर्धा होणार आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) आता सरकारला पत्र लिहून आपला संघ भारतात पाठवण्याची परवानगी मागितली आहे. पीसीबीने हे पत्र पाकचे पंतप्रधान शहबाज शरीफ (Shehbaz Sharif), गृह आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाला पाठवले आहे. पीसीबीने या पत्रात पाकिस्तान सरकारकडून अनेक महत्त्वाच्या बाबींची विचारणा केली आहे.
विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर लगेचच आम्ही आमचे सरकार आणि पाक पंतप्रधानांना पत्र लिहिले होते. आम्ही त्याची एक प्रत परराष्ट्र मंत्रालय आणि गृह मंत्रालयालाही पाठवली आहे. वर्ल्डकपमध्ये सहभागी होण्यासाठी आम्ही सरकारकडे परवानगी मागितली आहे, असे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने लिहिलेल्या पत्राबाबत पीसीबीने ईएसपीएन क्रिकइन्फोला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
2016 मध्ये भारतात खेळल्या गेलेल्या T20 विश्वचषकापासून पाकिस्तानी संघाने येथे भेट दिली नाही. त्याचबरोबर विश्वचषकापूर्वी पीसीबी सुरक्षा दल पाठवण्याचाही विचार करत आहे. याबाबतही त्यांनी सरकारला पाठवलेल्या पत्रात याबाबत त्यांचे मत विचारले आहे. विश्वचषकाच्या वेळापत्रकानुसार पाकिस्तान संघ भारतातील 5 ठिकाणी आपले सामने खेळणार आहे.
अहमदाबादमध्ये होणार सामना
एकदिवसीय विश्वचषकाच्या अधिकृत वेळापत्रकानुसार, पाकिस्तान संघ 6 ऑक्टोबर रोजी क्वालिफायर-1 संघाविरुद्ध पहिला सामना खेळेल. यानंतर हा संघ 12 ऑक्टोबरला क्वालिफायर-2 संघाविरुद्ध खेळेल. पाक संघ आपले सुरुवातीचे दोन्ही सामने हैदराबादच्या मैदानावरच खेळणार आहे. पाकिस्तानी संघ 15 ऑक्टोबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारताविरुद्ध तिसरा सामना खेळणार आहे. या 2 ठिकाणांव्यतिरिक्त, पाकिस्तान संघ बेंगळुरू, चेन्नई आणि कोलकाता येथेही आपले सामने खेळणार आहे.