PHOTOS: Who is Anshul Kamboj, who made his debut in the Manchester Test? A historic achievement in the Ranji Trophy..
भारताने सामन्याच्या दिवशी आपला प्लेइंग ११ संघ जाहीर केला आहे. या वेळी भारताकडून करूण नायरच्या जागी साई सुदर्शनला संघात स्थान देण्यात आले आहे. तर आकाश दीपच्या जागी अंशुल कंबोजला पदार्पण करण्याची संधी दिली आहे. तसेच पहिल्या प्रसिद्ध कृष्णाच्या जागी शार्दुल ठाकूरला पुन्हा एकदा संधी देण्यात अली आहे. अर्शदीप सिंग जखमी झाल्यानंतर त्याला संघात स्थान देण्यात आले आहे.
मँचेस्टर कसोटी सामन्यात भारतीय कसोटी संघात स्थान मिळालेल्या अंशुल कंबोजचा जन्म ६ डिसेंबर २००० रोजी हरियाणातील कर्नाल जिल्ह्यात झाला आहे. कंबोज हा उजव्या हाताचा मध्यमगतीचा वेगवान गोलंदाज आहे. तो गोलंदाजीसोबत चांगली फलंदाजी देखील करण्याची क्षमता ठेवतो. तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये हरियाणाकडून खेळताना दिसत असतो.
पदार्पणवीर अंशुल कंबोज गेल्या महिन्यात इंग्लंडमध्ये होता, जिथे त्याने इंडिया-अ संघाकडून खेळताना इंग्लंड लायन्सविरुद्ध २ प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. पहिल्या सामन्यात त्याने १ बळी टिपला आहे. तसेच २३ धावा देखील केल्या होत्या. दुसऱ्या सामन्यात त्याने दोन्ही डाव मिळून ४ विकेट घेतल्या आणि अर्धशतक देखील झळकावले आहे.
फेब्रुवारी २०२२ मध्ये अंशुल कंबोजने हरियाणाकडून त्रिपुराविरुद्ध रणजीमध्ये पदार्पण केले होते . २०२२-२३ च्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये त्याने ७ सामन्यात ७ विकेट्स घेतल्या होत्या. २०२३-२४ च्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये त्याने १० सामन्यात १७ विकेट्स घेऊन सर्वांना प्रभावित केले होते. तसेच २०२४-२५ च्या दुलीप ट्रॉफीमध्ये त्याने ३ सामन्यात १६ विकेट्स घेतल्या आहेत.
२०२४ मध्ये अंशुल कंबोज मुंबई इंडियन्सकडून खेळताना आयपीएलच्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. या हंगामात त्याने ३ सामने खेळले, ज्यामध्ये त्याने २ बळी टिपले होते. २०२५ मध्ये त्याला एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली खेळण्याची संधी मिळाली होती, या हंगामात त्याने ८ सामन्यांमध्ये १० विकेट्स पटकावल्या होत्या.
नोव्हेंबर २०२४ मध्ये रणजी ट्रॉफी दरम्यान अंशुल कंबोजने ऐतिहासिक गोलंदाजी करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. त्याने केरळविरुद्ध खेळताना एका डावात १० बळी घेऊन आपली जादू दाखवली होती. अशी कामगिरी करणारा तो इतिहासातील तिसरा गोलंदाज ठरला आहे. रोहतकमधील या सामन्यात त्याने ३०.१ षटकांच्या स्पेलमध्ये ४९ धावा देत १० बळी मिळवले आहे.