फोटो सौजन्य - Afghanistan Cricket Board सोशल मीडिया
अफगाणिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका : काल म्हणजेच २१ फेब्रुवारी रोजी दक्षिण आफ्रिका विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यामध्ये सामना झाला. या सामन्यांमध्ये अफगाणिस्तानच्या संघाला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला आहे. चॅम्पियन ट्रॉफीच्या ग्रुप बी मध्ये दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान यांच्यामधील पहिला सामना खेळवण्यात आला. दक्षिण आफ्रिकेने हा सामना मोठ्या फरकाने जिंकला. या सामन्यात अफगाणिस्तान संघाची कामगिरी खूपच खराब होती. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवानंतर अफगाणिस्तानचा कर्णधार हसमतुल्लाह शाहिदीही निराश दिसत होता. त्यानंतर त्यांचे मोठे विधान समोर आले आणि त्यांनी पराभवाचे कारणही स्पष्ट सांगितले आहे.
पराभवानंतर अफगाणिस्तानचा कर्णधार हसमतुल्लाह शाहिदी म्हणाला, “मला वाटते की आम्ही फलंदाजी करताना पुरेसे चांगले काम केले नाही. दुसऱ्या डावात खेळपट्टी त्यांना मदत करत होती, पण पहिल्या २० षटकांमध्ये आम्ही ज्या पद्धतीने फलंदाजी केली ती अपेक्षेनुसार नव्हती. मला वाटतं आज टॉस महत्त्वाचा होता, या खेळपट्टीवर खूप भेगा होत्या. ही कराचीची सामान्य खेळपट्टी नव्हती. तथापि, त्यांच्या गोलंदाजांनी शिस्तबद्ध लांबीने गोलंदाजी केली. मला अपेक्षा होती की आपण चांगले खेळू, आपण बरेच काही साध्य केले आहे आणि आपल्यात सर्वत्र लढण्याची क्षमता आहे.
तो पुढे म्हणाला, “आपल्याकडे काही महत्त्वाचे सामने शिल्लक आहेत, आम्ही आजचा सामना विसरून पुढे जाण्याचा प्रयत्न करू. रेहमत शाह खरोखरच चांगला खेळला, कठीण काळातही तो एक चांगला डाव होता. आम्ही सकारात्मकतेने पुढे जाऊ, आम्हाला अजूनही चांगले क्रिकेट खेळण्याची संधी आहे.”
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने ५० षटकांत ६ गडी गमावून ३१५ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेकडून फलंदाजी करताना रायन रिकेलटनने सर्वाधिक १०३ धावा केल्या. रिकल्टनने त्याच्या खेळीदरम्यान ७ चौकार आणि १ षटकार मारला. याशिवाय कर्णधार टेम्बा बावुमाने ५८, व्हॅन डर ड्यूसेनने ५२ आणि एडेन मार्करामने ५२ धावा केल्या. यानंतर, लक्ष्याचा पाठलाग करताना अफगाणिस्तानचा संघ ४३.३ षटकांत २०८ धावांवर ऑलआउट झाला. अफगाणिस्तानकडून फलंदाजी करताना रहमत शाहने सर्वाधिक ९० धावा केल्या. तर, दक्षिण आफ्रिकेकडून गोलंदाजी करताना कागिसो रबाडाने ३ विकेट्स घेतल्या.
Clinical South Africa breeze past Afghanistan with a neat all-round show 👊#ChampionsTrophy #AFGvSA ✍️: https://t.co/AixKlxVlha pic.twitter.com/ClRyPwAH5v
— ICC (@ICC) February 21, 2025
अफगाणिस्तानचा पुढील सामना २६ फेब्रुवारी रोजी इंग्लंडविरुद्ध खेळवला जाणार आहे तर २८ फेब्रुवारी रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे. दोन्ही क्रिकेट विश्वातील मजबूत संघ आहेत. त्याचबरोबर मागील वर्षांमध्ये अफगाणिस्तानच्या संघाने चांगले क्रिकेट दाखवले आहे. त्यामुळे अफगाणिस्तानच्या खेळीवर चाहत्यांची नजर असणार आहे.