मुंबई : कतार येथे सुरु असलेला फिफा विश्वचषक २०२२ आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचला आहे. १८ डिसेंबर रोजी अंतिम सामना होणार असून यात मेस्सीचा अर्जेंटिना संघ आणि फ्रान्सचा संघ अंतिम सामन्यात पोहोचले आहेत. दोन्हीही संघ आता अंतिम लढत जिंकण्यासाठी कसून सराव करीत आहेत. अशातच आता अर्जेंटिना संघासमोर एक मोठी अडचण निर्माण झाली आहे. कारण संघाचा कर्णधार आणि आघाडीचा खेळाडू लिओनेल मेस्सी ( Lionel Messi ) दुखापतग्रस्त झाल्याची माहिती समोर येत आहे.
क्रोएशियाविरोधातील सामन्यातच मेस्सी (lionel messi) हॅमस्ट्रिंगमुळं काहीसा अडचणीत असल्याचं पाहायला मिळालं. त्यातच गुरुवारी संपूर्ण संघ सराव करत असताना मेस्सी मात्र त्यात कुठेच दिसला नाही. त्यामुळे तो हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे त्रस्त असल्याचं उघड झालं. आता तो अंतिम सामना खेळणार की नाही? असा प्रश्न चाहत्यांच्या मनाला घोर लावत आहेत. दरम्यान, एकिकडे मेस्सीचे चाहते आणि सर्वच फुटबॉलप्रेमी चिंतेत असताना तज्ज्ञांच्या मते मेस्सी अंतिम सामन्यातून बाहेर जाण्याची शक्यता फार कमी असल्याची माहिती देखील मिळत आहे. या दुखापतीतून सावरत मेस्सी अंतिम सामन्यात मैदानावर उतरतो की नाही हे पाहणं औसुक्याच ठरणार आहे.