पाकिस्तानचा संघ टी २० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल झाल्यापासून पाकिस्तानी क्रिकेट चाहत्यांमध्ये काहीसा गर्व निर्माण झाला आहे. याआधी फायनल मध्ये गेलेल्या पाकिस्तान संघाची प्रशंसा करताना पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी ट्विट करून भारतीय संघाची खिल्ली उडवली होती. तर आता पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर (Shoaib Akhtar) याने देखील भारतीय गोलंदाजांना खोचक टोला लगावला आहे.
टीम इंडिया सेमी फायनलमध्ये इंग्लंडकडून पराभूत झाल्यानंतर शोएब अख्तर भारतावर सातत्याने टीका करत आहे. आता इंग्लंड पाकिस्तान अंतिम सामन्यादरम्यान देखील अख्तरने भारताला टोमणा मारला. आपल्या युट्यूब चॅनलवरील व्हिडिओत अख्तर म्हणाला की, ‘सेमी फायनल आणि फायनल सामन्यात फरक इताकच असणार आहे की इंग्लंडचा आत्मविश्वास हा आभाळात पोहचला असेल. मात्र इंग्लंडला माहिती आहे की पाकिस्तानचे गोलंदाज भारतासारखे नाहीत. त्यांना विजय मिळवण्यासाठी खूप कष्ट करावे लागणार आहेत. त्यांना जाता जाता विजय मिळवता येणार नाहीये.’
अंतिम सामन्यात पाकिस्तानच्या विजयाची किती शक्यता आहे याबाबत बोलताना अख्तर म्हणाला की, ‘संघाचा विजय हा बाबर आझम (Babar Azam) आणि मोहम्मद रिझवान यांच्यावर बराचसा अवलंबून असणार आहे. न्यूझीलंडविरूद्धच्या सामन्यात या दोघांचा स्ट्राईक रेट खूप महत्वाचा ठरला होता. मेलबर्नवरील विकेट या दोघांना तोच स्ट्राईक रेट कायम राखण्यास मदत करेल.’