गुरुवारी टी २० विश्वचषकातील (World Cup) अ गटातील अखेरच्या साखळी फेरी सामन्यात श्रीलंकेने नेदरलँडवर १६ धावांनी विजय मिळवला. या विजयासह श्रीलंका (Sri Lanka) संघाने सुपर १२ फेरीत प्रवेश केला आहे.
श्रीलंकेने फलंदाजी करून नेदरलँड (Nedarland) समोर १६३ धावांचे आव्हान दिले. मात्र नेदरलँडला २० षटकांमध्ये ९ बाद १४६ धावाच करता आल्या. सलामीवीर मॅक्सवेल ओडाऊड याने ५३ चेंडूंमध्ये नाबाद ७१ धावांची खेळी साकारत नेदरलँडच्या विजयासाठी प्रयत्न केले. या खेळीत त्याने ६ चौकार आणि ३ षटकार मारले, पण त्याच्या प्रयत्नांना यश लाभले नाही. फिरकी गोलंदाज वनिंदू हसरंगा याने २८ धावांच्या मोबदल्यात ३ फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.
श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामी फलंदाज कुशल मेंडिस याने ४४ चेंडूंत ५ चौकार व ५ षटकारांच्या साह्याने ७९ धावांची लाजवाब खेळी केली. त्यामुळे श्रीलंकेला ६ बाद १६२ धावा करता आल्या. पॉल वॅन मीकेरेन व बास लीडे यांनी प्रत्येकी २ फलंदाज बाद केले.