
IND U19 vs SL U19: India thrashed Sri Lanka in the semi-final! They made a grand entry into the final for the tenth time.
Team India has reached the final of the Under-19 Asia Cup 2025 : आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखाली अंडर-19 भारतीय संघाने आशिया कप 2025 च्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. पहिल्या सेमीफायनलमध्ये भारताने श्रीलंकेचा 8 विकेट्सने धुव्वा उडवत विक्रमी दहाव्यांदा जेतेपदाच्या सामन्यात प्रवेश केला. पावसामुळे प्रभावित झालेल्या सामन्यात श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करत 20 षटकांत 8 बाद 138 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात, विहान मल्होत्रा आणि आरोन जॉर्ज यांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने 18 षटकांत लक्ष्य गाठून अंतिम फेरीत प्रवेश केला. आता अंतिम सामन्यात भारताचा सामना पाकिस्तानसोबत होणार.
पहिला उपांत्य सामना पावसामुळे ५० षटकांऐवजी २० षटकांचा खेळवण्यात आला. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तर श्रीलंकेला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेचा संघ निर्धारित २० षटकांत ८ बाद १३८ धावाच करू शकला. भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच श्रीलंकेच्या फलंदाजीवर दबाव कायम ठेवल्याचे दिसून आले.
श्रीलंकेकडून चामिका हीनातिगलाने सर्वाधिक ४२ धावा फटकावल्या. कर्णधार विमथ दिनासाराने ३२ धावा आणि सेथमिका सेनेविरत्नेने ३० धावा करून बाद झाले. भारताकडून हेनिल पटेल आणि कनिष्क चौहान यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. तर किशन कुमार सिंग, दीपेश देवेंद्रन आणि खिलन पटेल यांनी प्रत्येकी एक बळी टिपला. ज्यामुळे श्रीलंकेला मोठी धावसंख्या उभारता आली नाही.
१३९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली नाही. कर्णधार आयुष म्हात्रे केवळ ७ धावा करून माघारी गेला. त्यानंतर वैभव सूर्यवंशी ९ धावा करून बाद झाला. दोन महत्त्वाच्या विकेट फक्त २५ धावांवर गेल्या होत्या. भारत आढकणीत सापडला असताना आरोन जॉर्ज आणि विहान मल्होत्राने भारताचा डाव सावरला. दोन्ही फलंदाजांनी कधी संयम आणि कधी आक्रमकतेचे दर्शन घडवत श्रीलंकेच्या गोलंदाजांवर चांगलाच दबाव आणला. आरोन जॉर्जने ४९ चेंडूत नाबाद ५८ धावा फटकावल्या. यामध्ये त्याने चार चौकार आणि एक षटकार लगावला. तर विहान मल्होत्राने ४५ चेंडूत नाबाद ६१ धावा काढल्या. ज्यामध्ये चार चौकार आणि दोन षटकारांचा समावेश आहे.
हेही वाचा : पाकिस्तानी कबड्डी खेळाडूच्या अडचणीत वाढ! भारतीय संघासोबत खेळल्याने PKF देणार कडक शिक्षा
आरोन आणि विहानच्या शानदार खेळीमुळे भारताने १८ षटकांतच विजयी लक्ष्य गाठले आणि अंतिम फेरीत धडक मारली. दुसऱ्या उपांत्य फेरीत बांगलादेशचा ८ विकेटने पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. त्यामुळे आता भारत आणि पाकिस्तान अंतिम फेरीत आमनेसामने असणार आहेत.