IND vs SA 5th t20I : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आज पाचवा टी-२० सामना खेळला जाणार आहे. या सामन्यापूर्वी अहमदाबाद हाय अलर्टवर आहे. अलिकडेच अहमदाबादमधील एका शाळेला आणि बडोद्यातील जिल्हाधिकारी कार्यालय बॉम्बने उडवून देण्याच्या धमक्या मिळाल्या होत्या, त्यामुळेच आता सुरक्षा अधिकारी हाय अलर्टवर आहेत. नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमभोवती कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली असून प्रत्येक हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे.
हेही वाचा : Ashes 2025 : १२ वर्षांनंतर पहिल्यांदाच घडले! ऑस्ट्रेलियाच्या अॅलेक्स कॅरीने केला ‘हा’ भीम पराक्रम
सामन्यापूर्वी, बॉम्ब आणि श्वान पथकाच्या पथके स्टेडियमबाहेर उपस्थित आहेत. ही पथके आजूबाजूच्या परिसरात कसून तपासणी करत असून पोलिस प्रशासनाने मैदानाभोवती कडक सुरक्षा बंदोबस्त राखला आहे आणि सर्व संभाव्य धोक्यांसाठी हाय अलर्टवर आहे. प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे की, धमकीनंतर सुरक्षेमध्ये तात्काळ वाढ करण्यात आली आहे. मैदानाबाहेर, पार्किंगमध्ये आणि आजूबाजूच्या परिसरात देखील कडक तपासणी करीनात येत आहे. प्रत्येक पाहुणा आणि कर्मचाऱ्यांची ओळख पटवली जात असून त्यांच्या बॅगा देखील तपासण्यात येत आहेत. सामना पूर्णपणे सुरक्षित वातावरणात खेळवला जावा यासाठी सुरक्षा मोहिम राबविली जात आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा टी-२० सामना दाट धुक्यामुळे पंचांनी रद्द केला होता. या सामन्यात नाणेफेक देखील होऊ शकली नव्हती. टी-२० क्रिकेटमध्ये धुक्यामुळे सामना रद्द होण्याची ही पहिलीच वेळ ठरली होती. तिसऱ्या टी-२० सामन्यात भारतीय संघाने शानदार कामगिरी केली होती. या मालिकेत भारताने २-१ अशी आघाडी घेतली आहे.
दक्षिण आफ्रिका आणि भारत हे दोन्ही संघ पाचव्या सामन्यात विजय मिळवण्याच्या उद्देशाने मैदानात उतरणार आहेत. सूर्या आर्मी मालिकेत आपली आघाडी कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल, तर दक्षिण आफ्रिका मालिका बरोबरीत साधण्यासाठी प्रयत्नशील असेल. प्रशासनाचे प्राधान्य हा सामना सुरक्षित आणि शांततेत खेळवला जावा हे असणार आहे. अहमदाबादमध्ये वाढलेल्या सुरक्षा व्यवस्थेत आणि वाढलेल्या सुरक्षा उपायांमध्ये, क्रिकेट चाहते एका रोमांचक सामन्याचा आनंद घेण्यासाठी सज्ज झाले आहेत.






