
IND-W vs SL-W : भारताने आठव्यांदा पटकावले महिला आशिया कपचे जेतेपद; श्रीलंकेवर 72 धावांनी मात
दुबई : सलामीवीर शेफाली वर्मा आणि उपकर्णधार स्मृती मानधना यांच्या आक्रमक अर्धशतकांनंतर गोलंदाजांनी केलेल्या शानदार कामगिरीच्या जोरावर भारताने रविवारी गतविजेत्या श्रीलंकेचा 72 धावांनी पराभव केला. या विजयासह भारताने विक्रमी आठव्यांदा महिला आशिया कपचे विजेतेपद पटकावले. श्री चरणी आणि दीप्ती शर्मा यांच्या फिरकीसमोर श्रीलंकेचा डाव अवघ्या 111 धावांत आटोपला.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताने २० षटकांत ५ बाद १८३ धावा केल्या. शेफाली वर्मा आणि स्मृती मानधना यांनी केवळ ७७ चेंडूंत १२९ धावांची तडाखेबंद सलामी दिली. शेफालीने ६८, तर मानधनाने ५९ धावा केल्या. अखेरच्या टप्प्यात श्रीलंकन गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांवर काही प्रमाणात नियंत्रण मिळवले; मात्र भारताने मोठी धावसंख्या उभारली.
शेफालीचे विक्रमी अर्धशतक
शेफालीने सुरुवातीपासूनच आक्रमक फलंदाजी करत श्रीलंकन गोलंदाजांवर दबाव निर्माण केला. तिने कर्णधार चामरी अटापट्टच्या पहिल्याच षटकात दोन षटकार आणि एक चौकार लगावत १८ धावा वसूल केल्या. तिने अवघ्या २४ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. यासह महिला आशिया कपमध्ये सर्वांत वेगवान अर्धशतक करण्याचा विक्रम तिच्या नावावर झाला. यापूर्वी हा विक्रम स्मृती मानधनाच्या नावावर होता. मानधनाने २०२२ मध्ये २५ चेंडूंत अर्धशतक केले होते.
भारताची धावसंख्या बिनबाद 98
भारताने पॉवरप्लेमध्ये एकही गडी न गमावता ५७ धावा केल्या. दहाव्या षटकानंतर भारताची धावसंख्या बिनबाद ९८ होती. शेफालीने ६८ धावांची खेळी केली. तिची आणि मानधनाची १२९ धावांची भागीदारी चामुंडी प्रबोधाने शेफालीला बाद केल्याने संपुष्टात आली.
स्मृतीचेही आक्रमक फटके
मानधनाने ३५ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. तिने सुरुवातीला संयमी फलंदाजी करत शेफालीला साथ दिली आणि नंतर आक्रमक फटके मारले. मात्र, कर्णधार हरमनप्रीत कौरसोबत धाव घेताना झालेल्या गैरसमजामुळे ती धावबाद झाली. या स्पर्धेत मानधना तिसऱ्यांदा धावबाद झाली.
भारताला केवळ 43 धावा करू दिल्या
१५ षटकांनंतर भारताची धावसंख्या २ बाद १४० होती आणि संघ २०० धावांचा टप्पा ओलांडण्याच्या दिशेने वाटचाल करत होता. मात्र, अखेरच्या पाच षटकांत श्रीलंकन गोलंदाजांनी अचूक टप्यावर गोलंदाजी करत भारताला केवळ ४३ धावा करू दिल्या. ऋचा घोषने १३ चेंडूंत १७ धावा केल्या, तर हरमनप्रीत कौरने १४ चेंडूंत १४ धावा केल्या. जी. कमालिनीने अखेरच्या दोन चेंडूंवर चौकार आणि षटकार ठोकत भारताची धावसंख्या १८३ पर्यंत नेली.
IND vs AFG : अभिषेक शर्माच्या वादळात अफगाणिस्तानचा उडाला धुरळा, केवळ 13.4 ओव्हरमध्ये ‘गेम खल्लास’