
IND W vs SL W Womens Asia Cup 2026 final
फलंदाजीमध्ये भारताचे सलामीवीर, स्मृती मंधाना आणि शफाली वर्मा यांच्यावर मोठी जबाबदारी असेल. दोघीही चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. शफालीने दोन अर्धशतके झळकावली आहेत, तर मंधानाने हाँगकाँगविरुद्ध शतक केले आहे. या दोघींकडून एका चांगल्या भागीदारीची अपेक्षा असेल. टीम इंडियाच्या मधल्या फळीतील फलंदाजांनी आतापर्यंत चांगली कामगिरी केलेली नाही. कर्णधार हरमनप्रीत कौरला मोठी खेळी करता आलेली नाही. त्यामुळे प्रतीका रावल,रिचा घोष आणि भारती फुलमाली यांच्याकडून मोठी अपेक्षा असेल.
दीप्ती शर्माच्या अष्टपैलू कामगिरीमुळे भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचला. दीप्तीने प्रत्येक सामन्यात आपल्या भेदक गोलंदाजीने विकेट्स घेतले आहेत. तिने बॅटनेही धावा केल्या आहेत. आतापर्यंत दीप्तीने ११ विकेट्स घेतले आहेत. बांग्लादेशविरुद्धच्या उपांत्य सामन्यात तिने ६ चेंडूंमध्ये १३ धावा करून भारताला १५० धावांचा टप्पा ओलांडण्यास मदत केली. दीप्तीला श्री चरणी आणि प्रेमा रावत यांनी उत्कृष्ट साथ दिली आहे. त्या दोघींनीही आपल्या फिरकी गोलंदाजीने चमकदार कामगिरी केली आहे. आतापर्यंत या तिन्ही फिरकी गोलंदाजांनी स्पर्धेत आपले वर्चस्व गाजवले आहे.
गट टप्प्यात भारताने थायलंड, हाँगकाँग आणि पाकिस्तानला धूळ चारली आहे. भारताने तिन्ही संघांविरुद्ध वर्चस्व गाजवत एकतर्फी विजय मिळवला आहे. उपांत्य फेरीत भारताने बांग्लादेशला नमवले. भारताने आतापर्यंत स्पर्धेत एकच संघ मैदानात उतरवला आहे. त्यामुळे, अंतिम सामन्यातही कोणतेही बदल अपेक्षित नाहीत. हरमनप्रीत कौर याच अकरा खेळाडूंसह अंतिम सामना जिंकण्याचा प्रयत्न करेल.
स्मृती मानधना, शेफाली वर्मा, प्रतिका रावल, हरमनप्रीत कौर (कर्णधार), रिचा घोष (विकेटकीपर), भारती फुलमाली, दीप्ती शर्मा, प्रेमा रावत, क्रांती गौड, श्री चरणी, नंदिनी शर्मा.