BPL : बांगलादेशी प्रीमिअर लीग बुडीत खात्यात; फ्रेंचायजीसकडून खेळाडूंचा पगार थकबाकी; टीम मालक पैशांच्या नावाने बनवताहेत बहाणा
Durbar Rajshahi BPL : बांगलादेश प्रीमियर लीगमध्ये सर्व काही ठीक चालले नाही. गोपनीय सूत्रांच्या माहितीनुसार, दरबार राजशाही संघातील अनेक खेळाडूंना त्यांचे वेतन मिळालेले नाही. पगार न मिळाल्यामुळे खेळाडूंनी यावर तीव्र निषेध व्यक्त केला आहे. संघातील अनेक खेळाडू सराव सत्राला पोहोचलेले नाहीत. संघ मालकांनी पगाराची तारीख अनेक वेळा वाढवली आहे आणि अद्याप यावर स्पष्ट उत्तर मिळालेले नाही.
दरबार राजशाही संघाच्या खेळाडूंनी व्यक्त केला निषेध
दरबार राजशाही संघाच्या खेळाडूंनी निषेध केला आहे. संघातील बांगलादेशी खेळाडूंना त्यांचे पगार मिळालेले नाहीत. फ्रँचायझीने पगाराची तारीख अनेक वेळा वाढवली आहे. संघ व्यवस्थापनाने सोमवारी सराव सत्राचे आयोजन केले होते. पण अनेक खेळाडूंनी या सरावसत्राला पाठ फिरवली. विशेष म्हणजे परदेशी खेळाडू आणि संघाच्या प्रशिक्षकांना पगाराच्या फक्त २५ टक्के रक्कम देण्यात आली आहे.
बांगलादेश क्रिकेट बोर्डाने फ्रँचायझी मालकाशी केली चर्चा
बीसीबी अध्यक्ष फारुख अहमद यांनी दरबार राजशाहीचे मालक शफीक रहमान आणि कर्णधार अनामुल हक यांच्याशी चर्चादेखील केल्याचे बोलले जात आहे. बोर्डाने खेळाडूंसाठी एक आपत्कालीन बैठक आयोजित केली होती. यामध्ये पगाराबाबत सुरू असलेल्या समस्येवर तोडगा काढण्याबाबत चर्चा झाली.
खेळाडूंच्या पगारासाठी नियम निश्चित
बीपीएल गव्हर्निंग कौन्सिलने सर्व खेळाडूंच्या फीचे वेळापत्रक तयार केले आहे. याअंतर्गत, खेळाडूंना स्पर्धेपूर्वी त्यांच्या शुल्काच्या ५० टक्के रक्कम मिळेल. यानंतर, स्पर्धेदरम्यान २५ टक्के शुल्क भरावे लागेल आणि स्पर्धा संपल्यानंतर २५ टक्के शुल्क भरावे लागेल. बीपीएल गव्हर्निंग कौन्सिलने संघांना बीसीबीला ८ कोटी बांगलादेशी टाका (अंदाजे ६५७,००० अमेरिकन डॉलर्स) ची बँक हमी देण्याचे निर्देश दिले. पण नंतर ते कमी करण्यात आले.