फोटो सौजन्य - सोशल मीडिया
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ च्या फायनलमध्ये जाण्यासाठी सर्व क्रिकेट संघांमध्ये चुरशीची लढत सुरु आहे. भारताचा संघ सध्या या गुणतालिकेमध्ये अव्वल स्थानावर आहे. पण अजूनही भारताच्या संघाला फायनलमध्ये जागा पक्की करण्यासाठी काही सामन्यांमध्ये विजय मिळवणं गरजेचं आहे. आता भारताचा संघ बॉर्डर गावस्कर ट्रॉफी खेळत आहे. यामधील चार सामने भारताच्या संघाने जिंकल्यास टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ च्या फायनलमध्ये जागा पक्की करू शकते.
दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना डर्बनमध्ये खेळवला जाणार आहे. पहिल्या डावात श्रीलंकेला अवघ्या 42 धावांत गुंडाळून यजमान संघाने सामन्यावरील पकड घट्ट केली आहे. दक्षिण आफ्रिकेकडे डर्बन कसोटी सामना जिंकण्याची सर्वाधिक शक्यता आहे. अशा स्थितीत, या विजयासह, संघ मालिकेत 1-0 अशी आघाडी घेईलच पण जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेतही मोठा फायदा होणार आहे. जर दक्षिण आफ्रिकेने पहिली कसोटी जिंकली तर ते न्यूझीलंड, श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाला सोडून भारतासह टॉप-2 मध्ये स्थान मिळवण्यात यशस्वी होईल.
बॉर्डर गावस्कर ट्रॉफी संबंधित बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा
सामन्याच्या दुसऱ्या दिवसअखेर दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या डावात 3 गडी गमावून 132 धावा केल्या आहेत. त्यांच्याकडे सध्या 281 धावांची आघाडी आहे. यजमान संघाने पहिल्या डावात 191 धावा केल्या होत्या.
टेम्बा बावुमाच्या नेतृत्वाखालील दक्षिण आफ्रिकेचा संघ सध्या 54.17 टक्के गुणांसह वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे. श्रीलंकेविरुद्धचा सामना जिंकून, संघाच्या खात्यात 56.26 टक्के गुण होतील (जर संघाला एकही डिमेरिट पॉइंट मिळाला नाही), या स्थितीत दक्षिण आफ्रिका 5व्या स्थानावरून झेप घेऊ शकते आणि थेट अव्वल स्थानावर येईल. भारताचा संघ दुसऱ्या स्थानावर तर पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियन संघ ५७.६९ टक्के गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर घसरेल. पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाला नमवल्यानंतर टीम इंडियाच्या खात्यात सध्या 61.11 टक्के गुण आहेत आणि भारत अव्वल स्थानावर आहे.
टीम इंडिया सध्या ६१.११ टक्के गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. भारताला ६ डिसेंबरपासून ॲडलेडमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध एक दिवसरात्र कसोटी सामना खेळायचा आहे. भारताने हा सामना गमावल्यास त्यांच्या खात्यात ५७.२९ गुण शिल्लक राहतील. तर ऑस्ट्रेलिया त्यांना ६०.७१ टक्के गुणांसह मागे टाकेल. दक्षिण आफ्रिकेची दुसरी कसोटीही 5 डिसेंबरपासून श्रीलंकेविरुद्ध आहे. अशा स्थितीत आफ्रिकन संघाच्या कामगिरीवर भारत आणि ऑस्ट्रेलियाची नजर असणार आहे.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये पाच सामान्यांची कसोटी मालिका होणार आहे. यामधील अजूनही चार सामने शिल्लक आहेत. बॉर्डर गावसकर ट्रॉफीचे हे सामने संपूर्ण डिसेंबर महिना सुरु असणार आहे त्यामुळे प्रेक्षकांसाठी क्रिकेटची मेजवानी असणार आहे.