US Open 2025: Jessica, Djokovic, Alcaraz enter quarterfinals; India's 'Maya' in second round
US Open 2025 : यूएस ओपनचा थरार चांगलाच रंगात आला आहे. मोठी मोठी नावं आपला जलवा दाखवू लागली आहेत. भारतीय चाहत्यांसाठी देखील आता आनंदाची बातमी आहे. भारताची युवा टेनिसपटू माया राजेश्वरन रेवतीने यूएस ओपन ज्युनियर मुलींच्या एकेरी गटात दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. तसेच चौथ्या मानांकित जेसिका पेगुलाने अमेरिकेच्या अँन लीचा पराभव करून यूएस ओपन क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला. तिने हा सामना फक्त ५४ मिनिटांत ६-१, ६-२ असा जिंकला.
हेही वाचा : UAE vs AFG : UAE च्या कर्णधाराने T20 मध्ये केला ‘हा’ भीम पराक्रम! मोडला ‘हिटमॅन’ रोहित शर्माचा विश्वविक्रम
आता तिचा सामना दोन वेळा ग्रँड स्लॅम विजेत्या बारबोरा क्रेज्किकोवाशी होईल. बारबोरानाने टेलर टाउनसेंडचा १-६, ७-६, ६-३ असा पराभव केला. जेसिका पेगुलाने या स्पर्धेत आतापर्यंत एकही सेट गमावलेला नाही. यूएस ओपन पुरुष एकेरीत, स्पेनच्या कार्लोस अल्काराजने आर्थर रिंडरक्नेचचा ७-६, ६-३, ६ ४ असा पराभव केला. तो ओपन युगात १३ ग्रँड स्लॅम क्वार्टर फायनलमध्ये पोहोचणारा सर्वांत तरुण खेळाडू ठरला आहे. सर्बियाच्या नोवाक ‘जोकोविचने क्वालिफायर जॅन लेनार्ड स्टफचा ६-३, ६-३, ६-२ असा पराभव केला. आता त्याचा सामना गेल्या वर्षीच्या उपविजेत्या टेलर फ्रिट्झशी होईल ज्याने टॉमस मार्चेकचा पराभव केला. जोकोविचने विक्रमी ६४ व्या ग्रैंड स्लॅम उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे.
भारताची युवा टेनिसपटू माया राजेश्वरन रेवतीने यूएस ओपन ज्युनियर मुलींच्या एकेरी गटाच्या दुसऱ्या फेरीत दिमाखात प्रवेश केला आहे. कोइम्बतूरच्या मायाने चीनच्या झांग कियान वेईचा ७-६, ६-३ असा पराभव करून यूएस ओपनची दुसरी फेरी गाठली आहे. १६ वर्षीय माया आता ब्रिटनच्या हन्ना क्लुगमनशी खेळेल जिने एस्पेन शुमनचा ६-०, ६-२ असा पराभव केला.
हेही वाचा : UAE vs AFG : रशीद खानने टी-२० मध्ये बनवले खास सिंहासन! सर्वांना पछाडून बनला नंबर-१ गोलंदाज
रोमानियाची सोराना क्रिस्टीची अलिकडेच एका स्पर्धेत जिंकलेली ट्रॉफी यूएस ओपन दरम्यान न्यूयॉर्कमधील तिच्या हॉटेलच्या खोलीतून अचानक चोरीला गेली असल्याची माहिती समोर आली आहे. तिने इन्स्टाग्रामवर लिहिले की, ज्यानेही द फिफ्टी सोनेस्टा हॉटेलच्या रूम नंबर ३१४ मधून माझी क्लीव्हलँड ट्रॉफी चोरली असेल, कृपया ती परत करून द्याल. त्याचे कोणतेही मूल्य नाही पण त्याचे भावनिक मूल्य खूप आहे. दुसऱ्या फेरीत कैरोलिना मुचोवाकडून पराभूत झाल्यानंतर सोराना यूएस ओपनच्या एकेरी प्रकारातून बाहेर पडली आहे.